विधानसभा अध्यक्षांची निवड आमदारांच्या कोरोना चाचणीनंतरच

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याची मागणी काँग्रेसकडून केली जात आहे; मात्र सर्व आमदारांच्या कोरोना चाचणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच अध्यक्षपदाची निवडणूक घेतली जाईल, असं अल्पसंख्याक मंत्री नबाब मलिक यांनी स्पष्ट केलं.

अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रणनीती

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत पावसाळी अधिवेशनातील मुद्दे, महामंडळ वाटप, विधानसभा अध्यक्ष निवडणूक, अनिल देशमुख ईडी चौकशी आदी प्रकरणावर चर्चा झाली.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्र्यांमध्ये जवळपास दोन तास चर्चा झाली.

महामंडळ, सरकारी समित्यावरील नियुक्त्या अधिवेशनानंतर

पटेल यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, खासदार सुप्रिया सुळे, खासदार सुनील तटकरे, हसन मुश्रीफ, जितेंद्र आव्हाड, आदी महत्वाचे नेते उपस्थित होते.

या बैठकीत पक्षाच्या संघटनवाढीबाबत चर्चा झाल्याचं मलिक यांनी सांगितलं. त्याचबरोबर महामंडळ वाटप, विविध शासकीय कमिट्यांवरील नियुक्तांबाबतचा निर्णय पावसाळी अधिवेशनानंतर केला जाईल.

त्यासाठी महाविकास आघाडीतील तिनही पक्ष एकत्र बसून चर्चा करतील असं मलिक यांनी सांगितलं.

महाविकास आघाडीत कुठलाही वाद नाही. तीनही पक्षात समन्वयाने काम सुरू आहे. भाजप संभ्रम निर्माण करण्याचं काम करतो. त्यांच्या बोलण्यात कुठलंही तथ्य नाही. पावसाळी अधिवेशनात भाजपच्या प्रत्येक प्रश्नाला आम्ही उत्तर देण्यासाठी तयार आहोत, असं त्यांनी सांगितलं.

राष्ट्रवादी काँग्रेस देशमुखांच्या पाठीशी

अनिल देशमुख पक्षाचे नेते आहे. परमबीर सिंग यांनी बदली झाल्यावर त्यांच्यावर आरोप केला आहे. केंद्र सरकारच्या दबावाखाली काही अधिकारी काम करत आहेत.

सीबीआय, ईडीचा तपास ज्या प्रकारे सुरू आहे, यावरुन हे दिसतं, की त्यांना मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस ठामपणे देशमुख यांच्या पाठीशी असल्याचंही मलिक यांनी या वेळी सांगितलं.