ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

हल्ल्यातील जखमी आखाडेंची झुंज अपयशी

उरुळी कांचन येथील गारवा हॉटेलचे मालक रामदास आखा़डे यांची गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेली मृत्यूची झुंज अखेर अयशस्वी झाली. त्यांच्यावर तीन दिवसांपूर्वी खुनी हल्ला झाला होता.

जिवघेणा हल्ला

रामदास आखाडे यांच्यावर रविवारी (ता. १८) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास तलवारीने जिवघेणा हल्ला झाला होता.

बुधवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला. आखाडे यांच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.

काय घडले?

पुणे-सोलापूर महामार्गावर उरुळी कांचन हद्दीतील खेडेकर मळ्याजवळ आखाडे यांच्या मालकीचे गारवा हॉटेल आहे. रविवारी रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास आखाडे एकटेच हॉटेलमध्ये बसले असताना, ह़ॉटेलच्या दरवाज्यातून आत आलेल्या आरोपींने तलवारीच्या साह्याने आखाडे यांच्यावर तलवारीने चार वार केले होते.

यात आखाडे गंभीर जखमी झाल्याने, त्यांना उपचारासाठी तात्काळ लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटल या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.

व्यावसायिक स्पर्धेतून हल्ला

आखाडे यांची प्रकृती आणखीनच गंभीर होत चालली होती. यामुळे आखाडे यांना पुढील उपचारासाठी काल (मंगळवारी) दुपारी पुण्यातील जहांगीर या खासगी रुग्णालयात दाखल केले होते; मात्र रामदास आखाडे यांची मृत्युशी चाललेली झुज बावन्न तासानंतर अखेर बुधवारी पहाटे अपयशी ठरली.

आखाडे यांच्यावर रविवारी झालेल्या हल्ल्यातील तीन संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे; मात्र या हल्ल्यामागील मास्टमाईंड अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.

यामुळे हल्ल्याचे नेमके कारण समजू शकलेले नाही; मात्र प्राथमिक तपासात मिळालेल्या माहितीवरुन हा हल्ला व्यावसायिक स्पर्धेतून झाला असण्याची शक्यता बळावली आहे.

 

You might also like
2 li