पुण्यातील शिक्षण प्रसारक मंडळने खेळाडू कोट्या संदर्भात ११ वी प्रवेशासाठी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. एस.पी. महाविद्यालय आणि नूमवि या संस्थांमध्ये अकरावीमध्ये पाच टक्के व्यवस्थापन कोट्यातून खेळाडूंना केवळ प्रवेश देण्यात येणार आहे.
ही प्रवेश प्रक्रिया दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर सुरू केली जाणार आहे. अकरावी प्रवेश प्रक्रियेत संस्थेला पाच टक्के जागा संस्थास्तरावर भरण्याची मुभा असते.
त्या अंतर्गत या संस्थेने व्यवस्थापन कोट्याची प्रक्रिया राबविण्यासाठी खास क्रीडा व्यवस्थापन कोटा प्रवेश समिती नेमण्यात येणार आहे. या समितीमध्ये प्राचार्य, सर परशुरामभाऊ महाविद्यालयातील क्रीडा संचालक, व्यवस्थापन समितीचे तीन प्रतिनिधी यांचा समावेश करण्यात येणार आहे.
व्यवस्थापन कोट्यातून खेळाडू विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी विशेष धोरण ठरविण्यात आले आहे. या धोरणानुसार क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, अॅथलेटिक, जिमनॅस्टिक्स, कबड्डी, खो खो, कुस्ती, मल्लखांब बॅडमिंटन, टेनिस, टेबल टेनिस, नेमबाजी, धनुर्विद्या, जलक्रीडा,
बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, बुद्धिबळ, साहसी क्रीडा खेळ या विविध खेळांमध्ये प्रावीण्य मिळविणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे.