मुंबई-हैदराबाद हाय स्पीड बुलेट ट्रेन पुणे जिल्ह्यातील सात तालुक्यांतून जात असून त्यासाठी सर्वेक्षण सुरू झाले आहे.

नव्वद गावातून जाणा-या या बुलेट ट्रेनला पुणे जिल्ह्यातील गावातून जमिनी देण्यास विरोध सुरू झाला आहे.

पुणे जिल्ह्यातील या तालुक्यांतून जाणार

या बुलेट ट्रेनसाठी मुंबईपासून हैदराबादपर्यंत सुमारे ६५० किलोमीटर लांबीमध्ये १७.५ मीटर रुंदीची जागा भूसंपादन करण्यात येणार असून, ११ स्टेशन प्रस्तावित आहेत. या बुलेट ट्रेन प्रकल्पाचा फायदा महाराष्ट्र, कर्नाटक व तेलंगण राज्यांना होणार आहे.

Advertisement

बुलेट ट्रेन ही पुणे जिल्हातील मावळ, राजगुरूनगर, हवेली, पुरंदर, दौंड, बारामती व इंदापूर तालुक्यातील ९० गावांमधून जाणार आहे.

पुणे जिल्ह्यातील कुरवंडे- लोणावळ्यापासून बुलेट ट्रेनला सुरुवात होणार असून, इंदापूर तालुक्यातील चाकाटी हे शेवटचे गाव आहे. चाकाटीनंतर ट्रेन सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार आहे.

सर्वेक्षण सुरू

सध्या बारामती व इंदापूर तालुक्यामध्ये बुलेट ट्रेनच्या मार्गाचे सर्वेक्षण सुरू असून, इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्रस्तावित बुलेट ट्रेनच्या प्रकल्पाला विरोध करण्यास सुरुवात केली आहे.

Advertisement

यामध्ये साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्यासह अनेक शेतकऱ्यांचा समावेश आहे. सर्वेक्षणामध्ये बुलेट ट्रेनच्या प्रकल्पामध्ये बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनीचे सर्वेक्षण सुरू आहे.

ज्या शेतामधून बुलेट ट्रेन जाणार आहे, त्या क्षेत्राची माहिती घेण्याचे काम सुरु असून, बागायती, जिरायती क्षेत्राचे वर्गीकरण करण्यात येत आहे. तसेच, प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबाचे सर्वेक्षण होणार आहे. प्रकल्पग्रस्तांच्या अपेक्षा जाणून घेण्याचे काम सुरू आहे.

बुलेट ट्रेनचा पर्यावरणावर काय परिणाम होऊ शकतो. तसेच, सामाजिक प्रभाव काय पडणार आहेत, याचेही सर्वेक्षण सुरू आहे. येत्या दोन महिन्यामध्ये सर्व्हेक्षण पूर्ण करण्याचे आदेश संबंधित कंपनीला दिले आहेत.

Advertisement