नळवणे (ता.जुन्नर) येथील श्री कुलस्वामी खंडेरायाच्या गडावर तीन चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला.

तीन चोरट्यांनी मंदिर आवारात प्रवेश करून मंदिराचा पुढील दरवाजा फोडला; परंतु स्वयंचलित सायरन यंत्रणा चालू होऊन गडावरील सायरन चालू झाले.

चोरटे सायरन वाजल्याने गडबडून गेले. सुरक्षा रक्षकांच्या सावधानतेमुळे व सायरन वाजल्याने चोरट्यांनी धूम ठोकली.

Advertisement

सतर्क नागरिकांची मंदिराकडे धाव

या मंदिरातील एकमागून एक असे दोन सायरन वाजले. दुसरा मोठा सायरन वाजल्याने चोर पळून गेले. सर्व परिसरात सायरनचा आवाज गेल्याने गावातील सतर्क नागरिकांनी ताबडतोब मंदिराकडे अवघ्या १५ मिनिटात धाव घेत गडावर पोहचले.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोर कैद

केवळ देवस्थानची सतर्क सुरक्षा यंत्रणा व गावातील अंदाजे ८० ते १०० जागरूक नागरिक पोहचल्यामुळे चोर पळून गेले व चोर चोरी करू शकले नाही.

आळेफाटा पोलिस तात्काळ उपस्थित झाले. पोलिस निरीक्षक मधुकर पवार यांनी देवस्थानला भेट देऊन पाहणी केली. देवस्थानच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तीन चोरटे दिसत असून, फुटेजच्या आधारे पोलिस पुढील तपास करीत आहेत.

Advertisement

गावच्या नागरिकांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला, अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब गगे यांनी दिली.

या परिसरात पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी केली आहे. या घटनेचा आळेफाटा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

 

Advertisement