पावसाचा कमी झालेला कालावधी, आर्द्रतेचे कमी-जास्त होत असलेले प्रमाण, पावसांत पडलेले मोठे अंतर याचा फटका जसा शेतक-यांना बसतो. तसाच तो औषधांसाठी लागणा-या बुरशींना ही बसला आहे.

बुरशींचा नैसर्गिक आकार कमी

वर्षभर जमिनीखाली सुप्तावस्थेत बसणाऱ्या बुरशीवर्गीय प्रजातींना पावसाच्या बदललेल्या वेळापत्रकाचा फटका बसला आहे.

पावसाळ्यातील अपेक्षित आर्द्रता मिळत नसल्याने बुरशीच्या अनेक प्रजातींची वाढ खुंटते आहे, तर काहींचा नैसर्गिक आकारही कमी होत असल्याचे अभ्यासकांच्या निदर्शनास आले आहे.

Advertisement

काय लागते बुरशीला ?

पावसाळी वातावरणात सक्रिय असलेल्या प्रजातींपैकी बुरशी या घटकाला निसर्गचक्रात विशेष महत्त्व आहे. वनस्पतींच्या बिया रुजविण्याचे काम बुरशीच्या विविध प्रजाती करतात.

पाऊस सुरू झाल्यावर जमिनीतील ओलावा वाढतो आणि भूमिगत बुरशीच्या प्रजाती डोके वर काढतात.

यातील काहींना मुसळधार पावसाची गरज असते, तर काहींना सातत्यपूर्ण जास्त आर्द्रता लागते. जेवढी आद्रर्ता जास्त तेवढी त्यांची वाढ चांगली होते.

Advertisement

पाऊस, आर्द्रतेअभावी धोका

हवामान बदलाच्या दुष्परिणामांमुळे पावसाचे वेळापत्रक बदलले आहे. जूनमध्ये मान्सून वेळेत दाखल होतो; पण जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत मान्सून विश्रांती घेत आहे.

यामुळे पश्चिम घाटालगतच्या डोंगररांगांत पावसाच्या सुरुवातीला बुरशीला अपेक्षित आर्द्रता मिळत नाही.

परिणामी बुरशीचा आकार कमी होतो; काही बुरशींची वाढ खुंटते. आर्द्रता नसल्याने जमीन कोरडी राहते आणि बुरशीची अपेक्षित वाढ होत नाही.

Advertisement

जलाशयांमध्ये वाढणाऱ्या बुरशींच्या प्रजातींना फरक पडत नाही; पण पावसावर अवलंबून प्रजातींचा धोका वाढल्याचे अभ्यासक सांगतात.

निसर्गसाखळीत बुरशीचे महत्त्व

निसर्गसाखळीत बुरशी महत्त्वाचा दुवा ठरते. जंगलात, गवताळ प्रदेशात दिसणाऱ्या वनस्पती जगण्यासाठी बुरशीचा आधार आहे.

वनस्पतींच्या बिया मातीत पडल्यानंतर आर्द्रतेतून येणाऱ्या बुरशीच्या कवचामुळे त्यांचे संरक्षण होते. पावसाळ्यात या बिया जमिनीत रुजतात आणि नवीन रोपे येतात.

Advertisement

निसर्गसाखळीत आणि माणसाच्या आरोग्यासाठी बुरशी आवश्यक घटक आहे. बुरशीच्या काही जाती आपल्या जेवणातही असतात. घरगुती मसाल्यांत दगडफूल या बुरशीचा; तसेच औषधांतही काही बुरशींचा वापर केला जातो.

 

Advertisement