file photo

पुणेः आॅक्सिजनच्या मागणीसाठी रुग्णांच्या नातेवाइकांचे प्राण कसे कंठाशी आले होते, हे गेल्या महिन्यापर्यंत दररोज अनुभवायला येत होते;

परंतु कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने रुग्णसंख्या घटली असून, आॅक्सिजनची मागणीही कमी झाली आहे.

३९ प्रकल्पांची कामे पूर्ण करणार

कोरोनाबाधित रुग्णांची संख्या घटली असल्याने सध्या पुण्यात ऑक्सिजनची मागणी अवघी १३४.५ टन झाली आहे. ऑक्सिजनची मागणी कमी होऊनही तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प उभारण्याचे काम हे सुरूच राहणार आहे.

Advertisement

पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्ह्यात ५४ ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प प्रस्तावित असून, त्यापैकी १५ प्रकल्पांचे काम पूर्ण झाले आहे.

आगामी काळात धोक्याची सूचना देण्यात आल्यामुळे उर्वरित ३९ प्रकल्पांची कामे ही पूर्ण केली जाणार आहेत.

अन्य राज्यातून आणावा लागला आॅक्सिजन

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमधील रुग्णसंख्या कमी झाली असल्याने ऑक्सिजनची मागणीही कमी झाली आहे. सध्या १३४.५ टन ऑक्सिजनची मागणी करण्यात येत आहे.

Advertisement

पुण्यात २९ एप्रिल रोजी सर्वाधिक ४२० टन ऑक्सिजनची मागणी झाली होती. त्या वेळी ऑक्सिजनचे वितरण करताना जिल्हा प्रशासनाची दमछाक झाली होती.

गुजरात, कर्नाटक आणि ओडिशा येथून ऑक्सिजन मागवावे लागले होते. हा अनुभव लक्षात घेऊन ऑक्सिजननिर्मितीचे प्रकल्प पूर्ण करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

प्रकल्पांची स्थिती काय?

पुण्यात १३ प्रकल्प सुरू करण्यात येणार आहेत. त्यापैकी पाच प्रकल्पांचे काम पूर्ण झाले असून, उर्वरित आठ प्रकल्पांचे काम सुरू आहे.

Advertisement

हे प्रकल्प महापालिकेचा निधी, कंपन्यांचे उत्तरदायित्व निधी (सीएसआर) आणि लोकप्रतिनिधींच्या निधीतून उभारण्यात येत आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात उभारण्यात येणाऱ्या नऊ प्रकल्पांपैकी दोन प्रकल्प पूर्ण, तर उर्वरित सात प्रकल्पांचे काम प्रगतीपथावर आहे.

यापैकी एक प्रकल्प थेरगाव हॉस्पिटल येथे उपलब्ध झाला आहे. तीन प्रकल्पांचे काम सुरू असून, अन्य तीन प्रकल्प हे ‘सीएसआर’ निधीतून उभारले जाणार आहेत.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागांत उभारल्या जाणाऱ्या ३२ प्रकल्पांपैकी आठ प्रकल्पांचे काम पूर्ण झाले आहे. अन्य २४ प्रकल्पांपैकी बारामती, इंदापूर, घोडेगाव आणि शिरोली येथील चार प्रकल्पांचे काम पूर्ण होत आले.

Advertisement