Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

युवक काँग्रेसच्या सरचिटणीसाविरोधात दरोड्याचा गुन्हा

पैशासाठी आणि मालमत्तेसाठी कोण कुठल्या थराला जाईल, हे सांगता येत नाही. गोळीबार करण्याची, जीवे मारण्याची धमकी देऊन कामगारांना मारहाण केली जाते. असाच प्रकार पिंपरी चिंचवड परिसरात घडला.

काम पाडले बंद
पिंपरी-चिंचवड शहरातील प्रसिद्ध व्यावसायिक नानासाहेब गायकवाड, त्यांचे चिरंजीव प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस केदार उर्फ गणेश गायकवाड यांच्यासह आणखी तिघांवर सांगवी पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपळे निलख येथे सुरू असलेल्या बांधकाम साईटवर बांधकाम करण्यासाठी गेलेल्या कामगारांना दमदाटी करून, सुरक्षा रक्षकास मारहाण करून आरोपींनी काम बंद पाडले.

पिस्तूलातून गोळीबार करण्याची धमकी
इतकंच नाहीतर साहित्य जबरदस्तीने नेऊन, दहशत निर्माण केली. धक्कादायक म्हणजे आरोपींनी जीवे मारण्याची धमकी देऊन पिस्तूलातून १० वेळा गोळीबार करण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

अजिंक्य विठ्ठल काळभोर (४५, रा. तुळजाई वस्ती, काळभोरनगर) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार, नानासाहेब गायकवाड (रा. औंध), केदार उर्फ गणेश गायकवाड (रा.औंध), गणेश साठे, राजा आणि त्यांचे २ ते ३ साथीदार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

परवानगी घेऊन सुरू होते बांधकाम
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी काळभोर यांनी त्यांच्या पिंपळे निलख येथील जागेवर बांधकाम करण्यासाठी सर्व परवानग्या घेतल्या आहेत. या जागेवर ले-आउट करण्यासाठी कामगार आणि ठेकेदार यांच्यासह ते त्या जागेवर गेले होते.

त्या वेळी आरोपींनी त्यांना शिवीगाळ करून धमकी दिली. चालू असणारे काम बंद पाडले. त्या जागेवर करण्यात आलेली संरक्षण भिंत, कंपाउंड, लोखंडी पोल, पाण्याची टाकी व इतर साहित्य असे ४८ हजार रुपयांचे साहित्य जबरदस्तीने काढून नेले.

Leave a comment