मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणा-यांविरोधात दाखल झालेले सर्वंच गुन्हे मागे घेण्याची मागणी होत होती.

ही मागणी अखेर राज्य सरकारने मान्य केली आहे. खासदार संभाजीराजे यांनी राज्य सरकारचे आभार मानले आहेत.

संभाजीराजेंची मागणी मान्य

मराठा आरक्षणासाठी आंदोलकांनी मूक मोर्चांवर भर दिला होता, तर काही मोर्चांना आणि मराठा आंदोलकांनी पुकारलेल्या बंदला हिंसक वळणही लागलं होतं. त्यामुळे अनेक आंदोलकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते.

Advertisement

हे गुन्हे तात्काळ मागे घेण्याची सातत्याने मागणी होत होती. खासदार संभाजीराजे यांनी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली होती.

या आधीच्या गृहमंत्र्यांकडेही त्यांनी ही मागणी केली होती. आज अखेर सरकारने त्यांची मागणी मान्य केली आहे.

आव्हाडांचं ते ट्वीट

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी तीन डिसेंबर 2019 रोजी ट्वीट करून मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी केली होती.

Advertisement

त्यांनी याबाबत ट्वीट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कॅबिनेट मंत्री जयंत पाटील यांच्याकडे ही मागणी केली होती.

आव्हाड म्हणाले, “मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान अनेक आंदोलकांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले होते. आता आपलं सरकार आलं आहे. त्यामुळे हे गुन्हे मागे घेण्यात यावेत, अशीच सर्वांची अपेक्षा आहे.”

मुंडेंचीही मागणी

राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनीदेखील हीच मागणी लावून धरत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन दिले होते.“मराठा समाजाने आरक्षणासाठी शांततापूर्ण आंदोलन केले.

Advertisement

त्या वेळी सहभागी युवकांवर तत्कालीन भाजप सरकारनं गुन्हे दाखल केले. आता ते गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे अशी मागणी ठाकरे यांच्याकडे केली आहे.

एकही तरुण या गुन्ह्यांमुळे शिक्षण, नोकरीपासून वंचित राहू नये यासाठी योग्य पाऊल उचलावे,” असं आवाहन मुंडे यांनी केले होते

 

Advertisement