मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर, सकल मराठा क्रांती मोर्चाच्या राज्य समन्वयकांची बैठक नाशकात होत आहे. या बैठकीतून मराठा आरक्षणासंदर्भातील पुढील आंदोलनाची दिशा स्पष्ट होणार आहे.
अंतिम फैसला होण्याची शक्यता
सोमवारी (दि. २१) नाशिक येथील नियोजित मूक मोर्चा झाल्यानंतर, खा. छत्रपती संभाजीराजे यांच्या उपस्थितीत समन्वयकांची आत्मचिंतन बैठक होणार असून
राज्य शासनाने मराठा समाजाच्या सहा मागण्या मान्य केल्या आहेत, उर्वरित मागण्यांबाबत वेळ मागितला आहे. त्यामुळे बैठकीत यावर अंतिम फैसला होण्याची शक्यता आहे.
आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाचा मूक मोर्चा
दरम्यान, मराठा आरक्षणासंदर्भात नाशिक येथे नियोजित मूक मोर्चा आंदोलन सोमवारी (दि. २१) सकाळी नऊ वाजता नाशिकमधील गंगापूररोडवरील रावसाहेब थोरात हॉलशेजारील मैदानात होणार आहे.
मोठ्या संख्येने उपस्थित रहावे
खा. छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या आंदोलनास, मराठा समाज व आरक्षणास पाठिंबा देणाऱ्या बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे,
असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक करण गायकर, तुषार जगताप, गणेश कदम, राजू देसले आदींनी केले आहे.
आंदोलनाबाबतच्या नियोजनासंदर्भात बैठक
सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा नाशिककडून आंदोलनाबाबतच्या नियोजनासंदर्भात बैठक झाली.
सर्व मंत्री, आमदार, खासदार व लोकप्रतिनिधींनी या आंदोलनात उपस्थित राहावे व मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत त्यांची भूमिका जाहीर करावी,
त्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जबाबदारी घ्यावी…
यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी आंदोलनास उपस्थिती लावावी. यासाठी त्या त्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जबाबदारी घ्यावी, असेही या वेळी स्पष्ट करण्यात आले.
समाजबांधवांसाठी अशी असेल आचारसंहिता
- आंदोलनस्थळी कुठल्याही लोकप्रतिनिधींचा अनादर होणार नाही, त्यांच्याविरोधात कुठलीही घोषणाबाजी करायची नाही.
- मूक आंदोलन असल्यामुळे फक्त एका जागेवर शांत बसून राहायचे आहे, अशी आचारसंहिता समाजबांधवांसाठी जारी करण्यात आली.
- आंदोलनात सहभागी होण्यासाठी समाजबांधवांनी काळ्या रंगाची वेशभूषा करून, दंडावर काळी फीत बांधून तसेच काळा मास्क परिधान करून यावे.
- पावसाची शक्यता लक्षात घेता, काळी छत्री, सॅनिटायझर सोबत ठेवून त्याचा वापर करावा, आंदोलनस्थळी आपल्यामुळे इतरांना त्रास होईल,
- कचरा होईल असे कोणतेही वर्तन करू नये, कोरोनाचे नियम कसोशीने पाळावेत, अशी सक्तताकीद समन्वयकांनी दिली आहे.