Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

वैफल्यग्रस्त भाजप सरकार करतेय अस्थिर

मुंबईः राज्यातील सरकार आमदार प्रताप सरनाईक यांच्या पत्रामुळे अस्थिर होत असल्याचा आरोप एकीकडे केला जात असताना दुसरीकडे भाजपवर टीका केली जात आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी, ‘ वैफल्यग्रस्त भाजप सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करीत आहे,’ असा आरोप केला आहे.

भाजपचा कुटील डाव यशस्वी होणार नाही

राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे सरकार भक्कम आहे. सरकारच्या कामगिरीवर जनताही समाधानी आहे; परंतु सत्ता नसल्यामुळे वैफल्यग्रस्त झालेला भाजप सीबीआय, ईडी, आयकर, एनआयए या केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून राज्यातील सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे. आमदार प्रताप सरनाईक यांच्या पत्रातूनही त्यांना केंद्रीय तपास यंत्रणा कसा त्रास देत आहेत हे स्पष्ट होत आहे. राज्यातील मविआ सरकार अस्थिर करण्याचे भाजपचे आतार्यंतचे सर्व प्रयत्न फेल गेले असून आताही त्यांचा कुटील डाव यशस्वी होणार नाही. सरकार पाच वर्षे चालेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

बाळासाहेबांचा मुलगा मुख्यमंत्री झालेले जाचतेय

“भाजप केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून सुरुवातीपासून शिवसेना आणि राष्ट्रवादीला त्रास देत आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे बोट धरून भारतीय जनता पक्ष वाढला, त्याच शिवसेनेला भाजप आता त्रास देत आहे, हा भाजपचा कृतघ्नपणा आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा मुख्यमंत्री झाला हे भाजपला पाहवत नसून त्यांची खूर्ची ओढण्याचा प्रयत्न ते करत आहेत,” असा आरोप पटोले यांनी केला.

Advertisement

दिल्लीतील बाॅसच्या इशा-यावर काम

“राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भाजपचे नेते सरकार अस्थिर करण्यासाठी आटापिटा करत आहेत. केंद्रीय तपास यंत्रणा या फक्त विरोधी पक्षांच्या लोकांवरच कारवाई करत आहेत. दिल्लीतील राजकीय बॉसच्या इशाऱ्याने विरोधकांवर दबाव आणण्याचे काम ते करत आहेत. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी त्यांना दिल्या जात असलेल्या त्रासाला पत्रातून वाचा फोडली आहे. ईडीच्या माध्यमातून विरोधकांना कसा त्रास दिला जातो हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व किरीट सोमय्या यांच्या बोलण्यातून वारंवार उघड झाले आहे,” असंही त्यांनी नमूद केलं.

मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी

“महाराष्ट्रातील सत्तेपासून वंचित राहिल्याने भाजप मागील दीड वर्षांपासून केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम पद्धतशीरपणे करत आहे. विरोधी पक्षाचे सरकार अस्थिर करण्याचे, विरोधांचा आवाज दाबण्याचे प्रकार सुरू आहेत; परंतु या दबावतंत्रामुळे भाजपचे सत्तेचे दिवास्वप्न हे स्वप्नच राहणार आहे. आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून कोणत्याही दबावाला हे सरकार बळी पडणार नाही,” असे पटोले म्हणाले.

Advertisement
Leave a comment