देशातील पहिले बहुमजली कारागृह मुंबईत

राज्याचे तुरुंग महानिरीक्षक सुनील रामानंद यांनी तुरुंग प्रशासनात मोठे फेरबदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्याला सरकारनं परवानगी दिली आहे. मुंबईतील चेंबूरमध्ये देशातील पहिले बहुमजली कारागृह मुंबईत बांधण्यात येणार आहे.

येरवडा, नाशिक, ठाणे कारागृहांचा विस्तार

चेंबूरमधील महिला आणि बालकल्याण विभागाची 15 एकर जागा त्यासाठी वापरण्यात येणार असून राज्य सरकारने त्याला मान्यता दिल्याचे मानंद यांनी सांगितले.

त्याचबरोबर राज्यातील येरवडा, नाशिक, नागपूर, ठाणे या कारागृहांचा विस्तार करण्याचा प्रस्तावही आपण पाठवल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप तत्वाचा उपयोग करण्यात येणार आहे.

खासगी विकासकांकडून तुरुंग बांधून घेणार

खासगी विकासकांद्वारे तुरुंग बांधून घेतले जातील आणि त्या बदल्यात तुरुंग प्रशासनाच्या ताब्यात असलेली जागा खासगी विकासकाला दिली जाईल.

त्याचबरोबर इथून पुढे कैद्यांना सुनावणीसाठी न्यायालयात प्रत्यक्ष उपस्थित न करता आभासी उपस्थितीतीचा उपयोग करावा असा प्रस्तावही आपण शासनाला पाठवल्याचे रामानंद यांनी म्हटले आहे.

कैद्यांना प्रत्यक्ष न्यायालयात सुनावणीसाठी हजर करण्याची अट आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे खटले प्रलंबित राहतात. तुरुंगातील कैद्यांची संख्या वाढत जाते, असे रामानंद यांनी म्हटले आहे.

त्याचबरोबर इथून पुढे तुरुंग उप अधीक्षक पदांची भरती फक्त तोंडी मुलाखतीद्वारे न करता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत करण्याचा प्रस्तावही आपण शासनाला पाठवला आहे, असे त्यांनी सांगितले.

१३ हजार कैद्यांना अंतरिम जामीन

सध्या कोरोनामुळे राज्यातील वेगवगेळ्या कारागृहातील 13 हजार कच्चा कैद्यांना अंतरिम जामीन मंजूर करून तुरुंगातून बाहेर सोडण्यात आले. जोपर्यंत कोरोना आहे, तोपर्यंत या कैद्यांना तुरुंगाच्या बाहेरच ठेवण्यात येणार आहे.

त्याचबरोबर ज्यांना शिक्षा सुनावण्यात आली, अशा गुन्हेगारांना पॅरोल मंजूर करण्यात येतोय; मात्र राज्यातील वेगवेगळ्या कारागृहातील 53 कैद्यांनी त्यांना पॅरोलवर बाहेर जाण्याची मुभा असतानाही तुरुंगातच राहणे पसंत केले.

कोरोनामुळे १३ कैद्यांचा मृत्यू

कोरोनामुळे आतापर्यंत राज्याच्या वेगवगेळ्या कारागृहांमधील 13 कैद्यांचा मृत्यू झाला आहे, तर दहा तुरुंग कर्मचाऱ्यांचा कोरोनाने बळी घेतला.

त्यामुळे जोपर्यंत कोरोना आहे, तोपर्यंत कच्चे कैदी तुरुंगाच्या बाहेर राहावेत आणि तुरुंगात कोरोना नियमांचे कडक पालन व्हावे, असा आपला प्रयत्न असल्याचे रामानंद यांनी म्हटले आहे.