आंतरराष्ट्रीय गणित ऑलिंपियाडमध्ये पुण्यातील अनिश कुलकर्णीने रौप्य, तर अनन्या रानडेने कांस्य पदक पटकावले आहे. यंदा गणित ऑलिंपियाडचे आयोजन रशियाने केले होते.

दोघेही बारावीचे विद्यार्थी

अनिश आणि अनन्या दोघेही बारावीचे विद्यार्थी असून, त्यांना भास्कराचार्य प्रतिष्ठानचे मार्गदर्शन लाभले आहे. अनिश म्हणतो,‘‘गणित शिकण्याची मला विशेष आवड असून, गणित सोडविताना एक वेगळेच समाधान मिळते.

मी आठवीपासून आंतरराष्ट्रीय गणित ऑलिंपियाडची तयारी करत होतो.’’ २०२० मध्ये भारताचा सहभाग रद्द झाल्याने आणि २०१९ मध्ये थोडक्यात टीममध्ये संधी हुकली, तरी निराश न होता अनिशने २०२१ मध्ये संघात सहभाग मिळविला.

Advertisement

अनन्या पाचवीपासून सजग

शालेय पाठ्यपुस्तकाबाहेरीलही गणित सोडविण्याची आवड असलेली अनन्या म्हणते,‘‘पाचवीला असताना माझ्या शिक्षकांनी माझ्या आईला माझ्या गणितातील आवडीबद्दल कळविले.

तेव्हापासून मी गणिताविषयी सजग आहे. अवघड गणित समजून घेण्यावर माझा जास्त भर राहीला आहे.’’

भारताला पाच पदके

हा कार्यक्रम व्हरच्युअली सेंट पीटर्सबर्ग येथे झाला. भारतीय संघात सहा विद्यार्थ्यांचा समावेश होता. या वर्षी भारतीय संघाने पाच पदके जिंकली.

Advertisement

त्यात एक सुवर्ण, एक रौप्य आणि तीन कांस्यपदकांचा समावेश आहे. या दोघांनाही एम. प्रकाश संस्थेचे तसेच किरण बर्वे, सुबोध पेठे, प्रशांत सोहनी आणि शिक्षकांचे सहकार्य लाभले.

अनिश गणितात करीअर करणार

‘‘गणिताकडे केवळ प्रश्न म्हणून पहायला नको. तर त्यामागील विज्ञानही समजून घ्यायला हवे. आता तर ऑलंपियाड झाली. यापुढेही गणितात करिअर करण्याची माझी इच्छा आहे,” असे रौप्य पदक विजेता अनिशने सांगितले.

गणितामुळे नवी विचारदृष्टी

कांस्य पदक विजेती अनन्या रानडे म्हणाली, “गणितामुळे तुम्हाला नवी विचारदृष्टी प्राप्त होते. गणित ही माझी आवड असून भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी), भारतीय विज्ञान संस्था (आयआयएससी) आणि चेन्नईच्या मॅथेमॅटीकल इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. त्यातच मी करीअर करणार आहे.”

Advertisement