पिंपरी : ब-याचदा कामे पूर्ण होतात; परंतु उद्‌घाटन कोणी करायचे, हाच वादाचा मुद्दा होतो. निगडीच्या पुलाबाबतही तसेच झाले आहे. उद्घाटकाच्या नावावर एकमत होत नसल्यानं त्याचा नागरिकांना भुर्दंड पडतो.

राजकीय पक्षांत संघर्षाची चिन्हे

निगडीतील बहुचर्चित आणि बहुखर्चिक उड्डाणपुलाची सर्व कामे पूर्ण झाली असतानाही त्याचे उद्घाटन कोणी करायचे, यावरून सत्तारूढ भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्याने संघर्षांची चिन्हे आहेत. कोणत्याही नावावर एकमत होत नसल्याने उद्घाटन लांबणीवर पडले आहे. विलंबामुळे या मार्गावरून दररोज जाणाऱ्या लाखभर वाहनस्वारांना दीड ते अडीच किलोमीटरचा वळसा पडतो आहे. या रहदारीचा स्थानिक रहिवाशांना त्रास होत असल्याने तातडीने उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्याची त्यांची मागणी आहे.

नव्वद कोटींचा प्रकल्प

निगडीच्या भक्ती-शक्ती चौकात ग्रेड सेपरेटर, उड्डाणपूल तसेच वर्तुळाकार रस्ता असा सुमारे ९० कोटी खर्चाचा एकत्रित प्रकल्प राबवण्यात येत आहे. विविध कारणास्तव बराच काळ रखडलेल्या या प्रकल्पाचे काम ३१ मे रोजी पूर्ण होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी सत्ताधाऱ्यांना कळवली; मात्र २२ दिवस ओलांडल्यानंतरही उद्घाटनाचे नियोजन झालेले नाही.

भाजप-राष्ट्रवादीत श्रेयवाद

पिंपरी पालिकेतील प्रकल्पांचे श्रेय घेण्यावरून भाजप-राष्ट्रवादीत जुना वाद असून त्यांच्यात यापूर्वी अनेकदा संघर्ष झाल्याचे शहरवासीयांनी अनुभवले आहे. याही वेळी तशीच परिस्थिती दिसते आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की उपमुख्यमंत्री अजित पवार यापैकी कोणाच्या हस्ते उद्घाटन करायचे की दोघांनाही आमंत्रित करायचे याविषयी अद्याप एकमत झालेले नाही. राष्ट्रवादी पवारांसाठी आग्रही आहे. फडणवीस यांच्यासह केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनीही उपस्थित रहावे, असा प्रयत्न भाजप वर्तुळात सुरू आहे.