पुण्यानजीकची २३ गावे महापालिकेत समाविष्ट झाली; परंतु या गावांतील ग्रामपंचायतीत तीन लाख रुपये भरून नोकरी मिळविलेल्यांचे भवितव्य आता अंधकारमय झाले आहे. महापालिकेत आल्यामुळं नोकरी राहील, की जाईल, अशी भीती पैसे भरून नोकरी मिळविलेल्यांमध्ये आहे.

२३ गावांत बोगस नोकरभरती

तीन लाख रुपये द्या… एक वर्ष दरमहा पाच हजार रुपये वेतनाचे व्हाउचर आणि गावे समाविष्ट झाल्यानंतर कायमस्वरूपी नोकरी मिळेल, असे आमिष दाखवून गेल्या वर्षभरात २३ गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर बोगस भरती केल्याचे समोर आले आहे.

अशा प्रकारे काही ग्रामसेवक आणि गटविकास अधिकाऱ्यांना हाताशी धरून भरती केलेल्यांची नोकरी गावे महापालिकेत समाविष्ट झाल्यामुळे धोक्यात आली आहे.

Advertisement

काहींची भरती रद्द

महापालिकेच्या हद्दीत ३४ गावे समाविष्ट करण्याचा निर्णय राज्य सरकारने यापूर्वीच घेतला होता; परंतु पहिल्या टप्प्यात ११ गावे समाविष्ट केली.

उर्वरित २३ गावे महापालिका निवडणुकीपूर्वी समाविष्ट होणार होती. त्यामुळे या गावांतील ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणावर बोगस भरती केल्याचे समोर आले आहे.

मांजरी बुद्रूक येथील एका ग्रामपंचायतीमध्ये अशा प्रकारे ३० कर्मचाऱ्यांची बोगस भरती झाल्याचे एका तक्रारीवरून नुकतेच उघडकीस आले होते. जिल्हा परिषदेने ही सर्व भरती रद्द करण्याचा निर्णय घेतला होता.

Advertisement

गटविकास अधिका-यांचाही हात

बावधन, सूससह २३ गावांमध्ये प्रत्येक उमेदवाराकडून तीन लाख रुपये घेण्यात आले. त्यासाठी बोगस रेकॉर्ड तयार केले आहे.

एक वर्षापासून या सर्व कर्मचाऱ्यांची नेमणूक केल्याचेही दाखविले आहे. त्यासाठी दरमहिना पाच हजार रुपयांच्या वेतनाचे व्हाउचर तयार करून तेदेखील लाटले आहेत.

दोन ते तीन महिने धनादेशाद्वारे वेतन देऊन हे कायमस्वरूपी कर्मचारी असल्याचा पुरावा तयार केला आहे. या सर्व प्रक्रियेत ग्रामसेवक आणि गटविकास अधिकारी यांचाही ‘हात’ असल्याचे समजते.

Advertisement

पात्र लोकांना सामावून घेणार

बावधन ग्रामपंचायतीमध्ये अशा प्रकारे जवळपास २०, तर सूसमध्ये ३८ कर्मचाऱ्यांची भरती केली आहे. यापूर्वी महापालिकेच्या हद्दीत ११ गावे समाविष्ट केल्यानंतर ग्रामपंचायतींमध्ये बोगस भरती केल्याचे निदर्शनास आले होते.

महापालिकेने त्यामध्ये १३६ कर्मचाऱ्यांना सेवेत समावून घेण्यास नकार दिला. त्यामुळे उर्वरित २३ गावांतील अशा बोगस भरती केलेल्या कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महापालिकेत समाविष्ट झालेल्या २३ गावांतील ग्रामपंचायती आणि जिल्हा परिषदेकडून सर्व रेकॉर्ड प्राप्त झाल्यानंतर त्याची तपासणी करण्यात येणार आहे.

Advertisement

त्यामध्ये जे पात्र ठरतील, आणि आयुक्त जे निकष निश्चित करतील, त्यांनाच नोकरीवर ठेवण्यात येणार आहे, असे महापालिकेतर्फे सांगण्यात आले.

 

Advertisement