पोलिसाच्या मुलानेच केला तरुणीवर बलात्कार

विवाहाचे आमिष दाखवून, तरुणीवर अत्याचार करण्याचे प्रकार वाढत आहेत. ऑनलाईन विवाह नोंदणी केंद्रावरून ओळख वाढवून नंतर तरुणींचा गैरफायदा घेण्याच्या घटनांतही वाढ होत आहे. तरुणी आमिषाला लगेच बळी पडून तरुणांच्या शिकार होतात.

पोलिस अधिका-याचा मुलगाच आरोपी

मॅट्रिमोनी साइटवरून ओळख झाल्यानंतर एका पोलिस अधिकाऱ्याच्या मुलाने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केला.

या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत २८ वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे.

त्यानुसार केतन शेळके (रा. पोलिस हौसिंग सोसायटी, नाशिक) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर २०२०दरम्यान शिवाजीनगर व नाशिक येथे ही घटना घडली.

अशी झाली फसगत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेने एका मॅट्रिमोनी साइटवर विवाहासाठी नोंदणी केली होती. त्यावरून आरोपीची तरुणीसोबत ओळख झाली. त्याने लग्नाची मागणी घालून तरुणीशी संपर्क वाढवला; फेसबुकवरही चॅटिंग सुरू केले.

तो तरुणीला पुण्यात भेटण्यासाठी आला. दोघेही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात भेटले. त्या वेळी त्याने तरुणीला शरीरसंबंधांची मागणी केली. तरुणीने नकार दिल्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून विश्वास निर्माण केला.

तरुणीला शिवाजीनगर येथील एका लॉजवर नेऊन बलात्कार केला. त्यानंतर तिला नाशिक येथे जबरदस्तीने घेऊन जाऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तरुणीला लग्नास नकार दिला.

फोनवरून शिवीगाळ

लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्यानंतर तरुणीने लग्नाबाबत विचारणा केली, तेव्हा संबंधित तरुणाने तरुणी व तिच्या आईला फोन करून शिवीगाळ केली. पुण्यात येऊन वाट लावण्याची धमकी दिली. त्यानंतर त्याने दुसऱ्या तरुणीसोबत लग्न केले आहे.