‘निवडणुक आयोगाला निवडणुका पुढे ढकलण्यासाठी सरकारी अधिकारी एक पत्र देतात; पण त्यासाठी सरकारने एक समिती गठन करावी व त्यात विरोधी पक्षाला सोबत घेऊन निवडणूक आयोगाला निवडणुक पुढे ढकलण्याची विनंती करण्याची पत्र दिले, तर निवडणुका पुढे ढकलता येतील; पण हे सरकार आरक्षण रद्द होण्याची वाट पाहत आहे, असा आरोप भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी केला.

कात्रजला चक्का जाम आंदोलन

ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर पंकजा यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या वतीनं कात्रज येथे चक्का जाम आंदोलन करण्यात आले, त्या वेळी त्या बोलत होत्या.

ओबीसी आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ देणार नाही,’ असा पुनरुच्चार पंकजा यांनी केला.

‘आम्ही निवडणुका होऊ देणार नाही असं म्हटल्यावर धुळे, नंदुरबारसह पाच जिल्ह्याच्या निवडणुका जाहीर झाल्या, हे त्यांनी निदर्शनास आणले.

चुकून सत्तेत आले

‘राज्य सरकार छोटं मन ठेवून मोठे होऊ शकत नाही. तुम्ही चुकून सत्तेत आलात पण एक लक्षात ठेवा भविष्यात कोणी तुम्हाला दारावरदेखील उभं करणार नाही, अशी टीका पंकजा यांनी केली.

मी ओबीसींना सांगू इच्छिते, आपलं मन तुटू देऊ नका. संघर्षाची भावना तुटू देऊ नका. ओबीसींच्या पाठीमागे भाजप खंबीरपणे उभी आहे,’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मंत्र्यांना आंदोलनाची भाषा शोभते का ?

‘ओबीसींच्या आरक्षणाचा मुद्द्यासाठी आम्ही चक्काजाम केलं. तेव्हा सरकारी पक्षही आंदोलनाची भाषा करायला लागले. मंत्री असतानाही आंदोलनाची भाषा करतात हे शोभतं का तुम्हाला?

असा सवाल करतानाच आम्ही सत्तेत असताना आंदोलन केलं का? आम्ही आरक्षण दिलं. मंत्री असूनसुद्धा तुम्ही आंदोलनाची भाषा करतात. मंत्र्यांनी निर्णय करायचे असतात.

आंदोलन करायला आम्ही रस्त्यावर उतरलोय, असा चिमटा पंकजा यांनी काँग्रेसला काढला आहे. तसंच, हे आंदोलन तुमच्या नाकर्तेपणामुळं होतंय,’ असा टोलाही लगावला आहे.