Breaking News Updates of Pune

विविध जिल्ह्यात अडकलेल्या नागरिकांबाबत सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

मुंबई लॉकडाऊन मध्ये देशभरात विविध ठिकाणी मजूर, कामगार, विद्यार्थी अडकून पडले होते. घरी जाण्यासाठी त्यांची धडपड सुरू होती. बऱ्याच लोकांनी पायीच चालत जाऊन आपले घर गाठले.

त्यानंतर केंद्र सरकारने श्रमिक विशेष रेल्वे गाड्यांच्या माध्यमातून त्यांना स्वगृही पाठवण्याचा निर्णय घेतला. याच धर्तीवर राज्यातील विविध जिल्ह्यात अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या घरी पाठवण्यासाठी राज्य सरकारनं पाऊल उचललं आहे.

राज्यात अडकलेल्या नागरिकांना एसटीद्वारे त्यांच्या घरी पोहोचवले जाणार आहे. यासाठी लागणारा प्रवासाचा खर्च देखील सरकार करणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.

या निर्णयाची अंमलबजावणी उद्यापासून 7 मे पासून होणार आहे. विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं की, 10 हजार एसटी बसेसची या साठी व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी जवळपास 20 कोटी रुपयांच्या वर अपेक्षित खर्च असून हा खर्च पुनर्वसन विभाग उचलणार आहे.

पुढच्या दोन दिवसांत राज्यात अडकलेल्या लोकांना त्यांच्या घरापर्यंत एसटीद्वारे सोडण्यात येणार आहे. राज्यात अडकलेल्या मजुरांमध्ये उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, पंजाब, कर्नाटक, पश्चिम बंगाल, छत्तीसगड अशा राज्यातील मजूर मोठ्या संख्येने आहेत.

सुमारे 5 लाख परप्रांतीय मजुरांची राज्य शासनाने त्यांना निवारा देऊन तसेच जेवणाखाण्याची साधारणत: 40 दिवस व्यवस्था केली, तसेच जोपर्यंत सर्वजण आपापल्या ठिकाणी जात नाहीत तोपर्यंत ती व्यवस्था सुरुच राहणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.