Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

सरकार पाडणार नाही, पडले तर पर्याय देऊःफडणवीस

मुंबई: राज्यातील महाविकास आघाडीतील तीनही घटक पक्षांनी सरकारला कोणताही धोका नसल्याचा एकमुखी सूर आळवल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पूर्वीचाच करेक्ट कार्यक्रम करण्याची भाषा वापरली आहे.

आपल्याच ओझ्याने पडणार सरकार

सत्तेत पुन्हा येण्यासाठी आम्ही कोणताही प्रयत्न करणार नसून हे सरकार आपल्याच ओझ्याने पडणार आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये कोण कोणावर नाराज आहे, याच्याशी आम्हाला काही देणेघेणे नाही, असे वक्तव्य फडणवीस यांनी केले आहे. ज्या दिवशी हे सरकार पडेल, त्या दिवशी आम्ही पर्याय देऊ, असे ते म्हणाले.

विरोधी पक्षाची जबाबदारी चोख पार पाडू

विधिमंडळाचे अधिवेशन ठरवण्याबाबतच्या बैठकीला फडणवीस उपस्थित राहिले होते. बैठकीनंतर त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे अनेक तर्कवितर्कांना उत आला आहे. आम्ही जनतेला जबाबदार आहोत. सत्तेत येण्यासाठी आम्ही काहीही करणार नाही. देशाच्या ७० ते ७२ वर्षांच्या कालखंडात अशा प्रकारची सरकारे चाललेली आपण पाहिलेले नाही. जोपर्यंत आम्ही विरोधी पक्षात आहोत, तोपर्यंत आम्ही विरोधी पक्षाची जबाबदारी चोखपणे पार पाडणार आहोत, असेही ते म्हणाले.

सत्ताधा-यांचा परस्परांवर अविश्वास

महाविकास आघाडी सरकारच्या तीन घटकपक्षांमध्ये सुसंवाद दिसत नाही. त्यांच्यात विसंवादच आहे. त्यांचा आता एकमेकांवर विश्वासही राहिलेला नाही, असे सांगतानाच,

तुमच्या भानगडींमध्ये राज्यातील जनतेला का भरडता आहात, असा सवालही फडणवीस यांनी केला आहे. तुम्ही एकमेकांना जोडे मारा,

हार घाला किंवा एकमेकांच्या गळात गळे घाला; मात्र तुम्ही जनतेला भरडू नका, असेही फडणवीस पुढे म्हणाले.

Leave a comment