दोन मद्यपी साथीदारांत वाद झाला. त्यातून एकाचा खून झाला. खुनी पसार झाला. पुरावा काहीच नव्हता; परंतु तांत्रिकतेच्या आधारावर पोलिसांनी तपास करून आरोपीला थेट नेपाळच्या सीमेवर गजाआ़ड केले.
दारू पिण्याच्या वादातून खून
सासवड येथील एका मजुराचा सोनोरी मार्गावर खून करण्यात आला. तो त्याच्या दारुड्या नेपाळी साथीदारानेच दारू पिण्याच्या वादातून केल्याचे आज स्पष्ट झाले.
गुन्हा उघडकीस आला असून आरोपीस नेपाळच्या सीमेवरून पकडून आणण्यात पोलिस निरीक्षक राहुल घुगे यांच्या नेतृत्वाखाली सासवड पोलिसांनी यश मिळवले आहे.
चार दिवसांची कोठडी
खून झालेल्या व्यक्तीचे नाव भगवान शंकर राव मारकड (वय 45, आरोशी टेरेस सोसायटी, गणेश कार्यालय मागे सासवड) असे असून तो टायर रिमोड करण्याच्या एका वर्कशॉपमध्ये काम करीत होता.
तर खून करणाऱ्या आरोपीचे नाव निरंजन सहानी (वय 21 राहणार बोरकर वस्ती सासवड, मूळ राहणार नेपाळ) असे आहे.
आरोपीस अटक केली असून दिनांक 19 जुलै पर्यंत त्यास पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश सासवड न्यायालयाने दिले आहेत.
काय घडले ?
मारकड व आरोपी निरंजन हे दारू, मटण पार्टीतील जोडीदार होते. घटनेच्या आदल्या दिवशी घटनास्थळापासून काही अंतरावरच असलेल्या बोरकर वस्तीमध्ये निरंजन याच्या रूमवर दोघांची दारू, मटण पार्टी झाली.
या पार्टीमध्ये दोघांचा दारू पिण्यावरून वाद झाला. त्यामध्ये मारकडला नेपाळी निरंजन याने लाकडी दांडक्याने मारहाण केली.
त्यात रक्तस्त्राव होऊन मारकडचा जागीच मृत्यू झाला. नंतर मृतदेह कोणाला दिसु नये, म्हणून लगेच जवळच्या नाल्यामध्ये ओढत नेऊन फेकून दिला. त्यानंतर आरोपी निरंजन एकाच्या दुचाकीने नेपाळकडे रवाना झाला.