Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

झिका आढळलेल्या गावांत घाणीचे साम्राज्य

संपूर्ण राज्याला हादरा देणारा झिका व्हायरसचा पुरंदरमध्ये शिरकाव झाला असून, याचा पहिला रुग्ण खळदगावच्या जवळील बेलसर गावात आढळल्याने खळबळ उडाली आहे.

अजय बायोटेक इंडिया लिमिटेड कंपनीमध्ये सुमारे अडीचशे ते तीनशे पुरुष, महिला कामगार काम करीत असून कंपनीच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे कामगारांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.

सर्वाधिक बाधित असूनही कंपनी बेफिकीर

ग्रामपंचायतीने संभाव्य धोका ओळखून आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर गावाला बाहेरून धोका होऊ नये यासाठी ग्रामपंचायती पदाधिकाऱ्यांनी व अजय बायोटेक या कंपनीला अचानक भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली असता अतिशय विदारक परिस्थिती आढळून आल्याने धक्का बसला.

Advertisement

कंपनीमध्ये होणाऱ्या कचऱ्याचे विघटन करण्यासाठी कोणत्याही प्रकारची व्यवस्था नाही. कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेमध्ये सर्वांत जास्त बाधित या कंपनीत आढळून आले होते, तरीदेखील कंपनी प्रशासनाला जाग आली नाही.

पाहणीच्या वेळी अधिकारी अनुपस्थित

या वेळी नीरा बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब कामथे, सरपंच कैलास कामथे, ग्रामपंचायत सदस्य योगेश कामथे, माजी उपसरपंच सुरेश रासकर, संजय कामथे, योगेश वि. कामथे, अभिजित कादबाणे उपस्थित होते; मात्र कंपनीच्या वतीने उत्तर देण्यासाठी कोणताही जबाबदार अधिकारी उपलब्ध नव्हता.

आरोग्याला मोठा धोका

अजय बायोटेक कंपनीमध्ये आमच्या गावचेच नागरिक, महिला काम करीत असून आजची ही परिस्थिती पाहता या दुर्गंधीयुक्त वातावरणात काम करून त्यांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे.

Advertisement

त्यामुळे याची प्रदूषण महामंडळाकडे तातडीने तक्रार करणार असून या कंपनीची तपासणी होणे गरजेचे आहे, असे सरपंच कैलास कामथे यांनी सांगितले.

घाणीचा ढिगाऱ्यांतून दुर्गंधीयुक्त काळे पाणी

कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारावर चिखलाचा राडारोडा पसरला आहे, तर बाजूला असणाऱ्या पाण्याच्या टाकीमध्ये संपूर्ण उघडे व हिरवे पाणी दिसले.

ही कंपनी खताचे उत्पादन करीत असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर छोटे, मोठे बॅरल, कागदी पुठ्ठे, औषधांच्या रिकाम्या बाटल्या व इतर साहित्य हे कंपनीच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर उघड्यावर पडले आहे.

Advertisement

या घाणीचा डिगाऱ्यांमधून दुर्गंधीयुक्त काळेपाणी कंपनीमध्ये पसरले आहे. त्यावर मोठ्या प्रमाणावर मच्छरांची पैदास होत आहे.

 

Advertisement
Leave a comment