पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रशासन जसं तयारीला लागलं आहे, तसं राजकीय पक्षही तयारीला लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसनं शहर पदाधिका-यांच्या निवडीसाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

जम्बो कार्यकारिणी होणार

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प्रशांत जगताप यांनी आपली ‘जम्बो’ कार्यकारणी तयार करण्यासाठी तयारी सुरू केली आहे.

‘राष्ट्रवादी’चा पदाधिकारी होण्यासाठी एक हजार चारशे जणांनी अर्ज दाखल केले असून, जगताप यांनी मुलाखती घेणं सुरू केलं आहे. या मुलाखतींनंतर दीडशे जणांची जम्बो कार्यकारणी तयार करण्यात येणार असल्याची माहिती जगताप यांनी दिली आहे.

Advertisement

निवडणुकीचा अंदाज बांधणं सुरू

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यासाठी असा प्रयोग राबविला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुलाखती घेऊन कार्यकर्त्यांचा ‘अंदाज’ घेणं सुरू झालं आहे.

महापालिकेच्या आगामी निवडणुकांमध्ये चांगल्या पदाधिकाऱ्यांची फळी उभारणं आणि त्याद्वारे महापालिकेतील सत्ताधारी भाजपचा पराभव करणं, याकडे प्राधान्याने लक्ष देण्यात येत आहे. या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमांतून पक्षविस्तार अधिक वेगाने करणार असल्याची माहिती जगताप यांनी व्यक्त केली.

‘मुलाखतीनंतरच निर्णय’

शहर कार्यकारिणीसाठी इच्छुक असणाऱ्या कार्यकर्त्यांना अर्ज करण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार १,४०० जणांनी अर्ज दाखल केले असून, त्यातून दीडशे जणांची जम्बो कार्यकारिणी तयार करण्यात येणार आहेत. या मुलाखतीनंतर कार्यकारिणीत कार्यकर्त्यांना स्थान देण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे जगताप यांनी सांगितले.

Advertisement