दुर्बल गटातील मुलीला प्रथितयश शाळेत प्रवेश मिळाला होता; मात्र प्रवेश निश्चितीसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यानं मुलीच्या आईकडे तब्बल 50 हजार रुपयांची लाच मागितली.

या महिलेच्या तक्रारीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रार दिल्यानं या लाचखोर अधिकाऱ्याला सापळा रचून रंगेहाथ पकडलं आहे.

आरटीई कायद्यांतर्गत मिळाला होता प्रवेश

समाजातील सर्व स्तरांतील मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावं या हेतूनं सर्व खासगी शाळांमध्ये दुर्बल घटकांतील मुलांना शिक्षण अधिकार कायद्याखाली प्रवेश दिला जातो.

Advertisement

या कायद्याअंतर्गत सर्व शाळांमधील 25 टक्के जागा राखून ठेवण्यात येतात आणि तिथं समाजातील वंचित, दुर्बल घटकातील मुलांना प्रवेश दिला जातो. याच कायद्याअंतर्गत प्रवेशासाठी महिलेला कागदपत्रे हवी होती.

हे लाचखोर अधिका-याचे नाव

शिवाजी बबन बोखरे असं या अधिकाऱ्याचं नाव असून, तो पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागात सहाय्यक प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे.

50 वर्षीय बोखरे यानी या मुलीच्या आईकडे शालेय प्रवेशासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे देण्यासाठी 50 हजार रुपयांची लाच मागितली होती.

Advertisement

कागदपत्रासाठी मागितली लाच

शिक्षण अधिकाराखाली या मुलीला एका प्रथितयश शाळेत प्रवेश मिळाला होता. शाळेत आरटीई अंतर्गत प्रवेश देण्यात आलेल्या मुलांच्या यादीत या मुलीचं नाव होतं.

त्याकरता आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी महापालिकेच्या शिक्षण विभागाकडं त्या मुलीच्या आईनं संपर्क साधला होता. त्या वेळी बोखरे यानं 50 हजार रुपये दिल्यास कागदपत्रे देण्याची अट घातली होती.

या मुलीच्या आईनं लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार नोंदवली. त्याची दखल घेत, या लाचखोर अधिकाऱ्याला पुराव्यासकट पकडण्याकरता लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं सापळा रचला आणि 50 हजार रुपयांची लाच स्वीकारताना बोखरे याला रंगेहाथ पकडण्यात आलं.

Advertisement