मुसळधार पावसाने पुण्यातील भोर तालुक्याच्या कोंढरी गावाजवळ दरड कोसळली. त्यामुळे प्रशासनानं संपूर्ण गाव स्थलांतरित केलं. दरड कोसळल्यानं कोंढरी गावातील ग्रामस्थ प्रचंड भयभीत झाले आहेत.

अतिवृष्टीनं भोर महाड रस्त्यावर प्रचंड प्रमाणात भुस्खलन झालं. 30 ठिकाणी दरड कोसळल्यानं भोर महाड रस्ता संपूर्ण बंद झाला.

गाव संपर्काबाहेर

कोंढरी गावात मोबाईल नेटवर्क नसल्यानं नागरिकांचा कोणाशीही संपर्क नाही. गावातील 300 जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलं.

दरडी कोसळल्यानं रस्त्यावर अक्षरशः दगडांचा खच पडला. डोंगरावरून झाडं रस्त्यावर आलीत. त्यामुळे आणखी पाच दिवस रस्ता मोकळा करण्यासाठी लागणार आहे.

आमदार संग्राम थोपटे यांनी कोंढरीतील परिस्थितीवरून सरकारवर हल्लाबोल केला. शासन कोंढरी गावचं तळीये किंवा माळीण होण्याची वाट पाहात आहे का, असा सवाल थोपटे उपस्थिती केला.

12 गावं अंधारात

अतिवृष्टीमुळे पुणे जिल्ह्यालाही मोठा फटका बसला. मुसळधार पावसानंतर भोर तालुक्यातील 12 गावं अंधारात गेली, तर 7 गावांचा संपर्क तुटला.

याशिवाय डोंगराला भेगा पडल्याने शेजारील संपूर्ण कोंढरी गावाचं स्थलांतर केलं. या गावातील सर्व लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.

तीन वर्षांपासून भूस्खलन

घाटमाथ्यावर सलग पडणाऱ्या पावसामुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. कोंढरी गावात सलग 3 वर्षांपासून भूस्खलन होत आहे. त्यामुळे या वर्षी सुद्धा गावातील 40 कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे.