भागीदारीत व्यवसाय करणं आणि खात्याची माहिती भागीदाराला देणं एका व्यवसायिकाला चांगलंच महागात पडलं. दोन कंपन्या बळकावण्यात आल्या;शिवाय दीड कोटी रुपयांना चंदन लागले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

काय घडले ?

भागीदारीत व्यवसाय करण्यास प्रवृत्त करून पिंपरीतील एका व्यक्तीची तब्बल दीड कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची घटना घडली.

आरोपीनं विश्वासघात करत फिर्यादीच्या अकाऊंटमधून पैसे लंपास केले आहेत. हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही तर आरोपीनं भागीदारीतील दोन्ही व्यवसाय आपल्या ताब्यात घेतले आहेत.

Advertisement

व्यवसायाच्या ठिकाणी गेलं असता आरोपीनं फिर्यादीस धक्काबुक्की करत जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

यांची झाली फसवणूक

सीताराम हाथीराम चौधरी असं फसवणूक झालेल्या 36 वर्षीय व्यक्तीचं नाव असून ते पुनावळे येथील रहिवासी आहेत.

फिर्यादी सीताराम चौधरी यांच्या तक्रारीनंतर, हिंजवडी पोलिसांनी मुख्य आरोपी विनोदकुमार पारसमल जैन याच्यासह प्रकाश गुजर, राजेश, पुणे पीपल्स बँकेच्या कोथरूड शाखेचा सेवानिवृत्त व्यस्थापक महेश प्रभाकर केंकरे आणि संबंधित बँकेचे तत्कालीन सेवक स्वप्नील राक्षे आदी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी संगनमत करत 2019 ते 2020 च्या दरम्यान फिर्यादीची फसवणूक केली आहे.

Advertisement

खात्यात फेरफार

आरोपी विनोदकुमार जैन यानं फिर्यादीला अंतर्मना पी. व्ही ग्रेनाईट आणि अंतर्मना टाईल्स या फर्मच्या नावानं 33 गुंठे जागा भाड्यानं घेण्यास आणि त्याठिकाणी ग्रेनाइट विक्रीचा व्यवसाय करण्यास सांगितलं.

त्यासाठी 32 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा भरवसाही दिली. फिर्यादीचा विश्वास संपादन केल्यानंतर, आरोपीनं काही दिवसांनी फिर्यादीच्या मालकीच्या अंतर्मना टाइल्स या फर्मच्या पुणे पिपल्स को. ऑप. बँकेच्या कोथरूड शाखेतील खात्याच्या माहितीत फेरफार केला.

आर्थिक गैरव्यवहार

आरोपी विनोदकुमार यानं बँक मॅनेजर केंकरे आणि राक्षे यांची मदत घेतली. आरोपीनं फिर्यादीच्या बँक खात्याचा मोबाइल नंबर बदलून स्वतःच्या मोबाइल नंबरची नोंद करून घेतली.

Advertisement

त्यानंतर आरोपीनं फर्मच्या बँक खात्यातून तब्बल 82 लाख 28 हजार 82 रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केला.

तसेच अंतर्मना टाईल्समध्ये अद्याप 34 लाखाहून अधिक रुपयांचा स्टॉक असताना आरोपीनं फिर्यादीच्या फर्मवर कब्जा केला. तसेच फिर्यादीच्या सह्या असलेल्या धनादेशाचा वापर करत पैसे लुबाडले आहेत.

 

Advertisement