लोणावळा : मावळ तालुक्यातील पवना नदीवरील थुगाव-बौर पूल कोसळला आहे. धोकादायक झालेला ५० वर्षांपूर्वीचा उभारण्यात आलेला पूल ढासळल्याने या परिसरातील अनेक गावांच्या दळणवळणाचा प्रश्न गंभीर झाला असून अनेक गावांना जोडणाऱ्या या पुलामुळे परिसरातील गावांचा संपर्क तुटला आहे.

वळसा घालून जावे लागणार

गेल्या वर्षी पवना नदीला आलेल्या महापुरात या पुलाच्या दोन ते तीन मोऱ्यांचा बराच भाग वाहून गेला होता. यामुळे हा पूल वाहतुकीस धोकादायक झाला होता. बौर गावच्या हद्दीत वेंकटेश्वरा कंपनीची कुक्कुटपालन व कुक्कुट चिकनचे विविध प्रकारचे फुड उत्पादन करणारी वेंकीज ही कंपनी आहे.

Advertisement

या कंपनीतील बहुतांश कामगार हे या पुलावरून कंपनीत कामाला जात होते. पूल ढासळल्याने या कामगारांना कामावर जाण्यासाठी काही किलोमीटर अंतरावरून वळसा घालून जावे लागणार आहे. या पुलापासून वेंकीज कंपनी अवघ्या एक ते दीड किलोमीटर अंतरावर आहे;

मात्र थुगाव गाव आणि परिसरातील गावातील कामगारांना यापुढे ७ ते ८ किलोमीटर वळसा घालून कंपनीत कामावर जावे लागणार असल्याने त्यांना इंधनाच्या दृष्टीने आर्थिक व वाढत्या अंतरामुळे मानसिक त्रासाला सामोरे जावे लागणार आहे.

नवीन पूल उभारण्याची मागणी

Advertisement

दरम्यान, गतवर्षी पुलाचा भाग ढासळून पूल धोकादायक झाल्यामुळे नवीन पूल उभारण्याची मागणी नागरिकांनी केली होती; मात्र तो उभारला न गेल्याने अखेर जीर्ण व धोकादायक थुगाव-बौर पूल कोसळला आहे.