राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व त्यांचे कुटुंबीय अतिशय पुरोगामी आहेत. कर्मकांड, अंधश्रद्धांना ते मानीत नाहीत; परंतु त्यांच्याच पक्षाचे पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस भवन आता काळ्या बाहुली आणि कोहोळामुळे चर्चेत आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाला अंधश्रद्धेचा विळखा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या आणि तो उद्घाटन समारंभ वादग्रस्त ठरलेल्या पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाला अंधश्रद्धेचा विळखा बसला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस कार्यलयाच्या गेटवर काळी बाहुली आणि कोहळा लावण्यात आला आहे. त्यावरुन भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांच्यासह विज्ञानवाद्यांकडून आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीने राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे.

Advertisement

वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाच्या गेटवर काळी बाहुली आणि कोहळा लावणं हे अंधश्रद्धेचं प्रतिक आहे. अंधश्रद्धेचा हा प्रकार घालवण्यासाठी अजून किती प्रयत्न करावे लागणार, असा सवाल अंनिसनं केला आहे.

राजकीय पक्षांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव आहे. झालेली चूक लवकरात लवकर दुरुस्त करावी अशी मागणीही अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी केली.

पुरोगामीपणाच्या गप्पा आणि काळी बाहुली

भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर ट्विटरच्या माध्यमातून जोरदार टीका केली. ‘पुरोगामीपणाच्या उठता बसतां गप्पा मारणाऱ्या राष्ट्रवादीच्या पुण्यातील कार्यालयाबाहेर काळी बाहुली? गप्पा पुरोगामीपणाचा आणि काम अंधश्रध्दा वाढविण्याचे’, असा टोला केशव उपाध्ये यांनी लगावला आहे.

Advertisement

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षांचं स्पष्टीकरण

राष्ट्रवादी काँग्रेस अंधश्रद्धा पसरवत नाही. राष्ट्रवादीच्या कार्यालयात एकूण 22 ऑफिसेस आहेत. जागेच्या मालकानं काळी बाहुली आणि कोहळा लावला असेल तर आम्हाला माहिती नाही.

याबाबत आम्ही जागेच्या मालकाला नक्कीच निरोप देऊ, अशी सारवासारव राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केली आहे.

 

Advertisement