‘न्यायहक्कासाठी रस्त्यावर उतरणं हे आमच्या धमन्यात भिनलं आहे; पण संघर्ष करत असताना संघर्ष कधी करायचा आणि संवाद कधी करायचं हे ज्याला कळतं तोच खरा नेता असतो, असं मत व्यक्त करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खासदार संभाजीराजे यांना धन्यवाद देताना भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा साधला.

सारथी केंद्राचे उद्घाटन

राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं कोल्हापुरात सारथी संस्थेच्या उपकेंद्राचा प्रारंभ पार पडला. त्या वेळी ते बोलत होते.

फक्त आदळआपट करणं याला मी नेतृत्व म्हणत नाही. समोर मिळतंय ते सुद्धा आदळआपट करून तोडून टाकणे, हे नेतृत्वाचे लक्षण नाही.

संघर्षाच्या वेळी जरुर संघर्ष केला पाहिजे; पण जेव्हा आपल्या लक्षात येतं, की सगळे एकमताचे आहेत, तेव्हा तिथे संघर्ष थांबवून संवाद सुरू केला पाहिजे. तो संवाद संभाजीराजेंनी सुरू केला, असे ठाकरे म्हणाले.

संभाजीराजे योग्य तेच बोलणार

‘संभाजीराजेंचं नेहमी मी कौतुक करत असतो. त्यामुळं अनेकांना असं वाटतं आम्ही संभाजीराजेंना पटवलं आहे; पण संभांजीराजे काही पटणारा माणूस नाहीत.

ते योग्य तेच बोलणार. साधारणतः भावना, मतं, आणि स्वभाव जुळतात आणि हेतू साफ आणि स्पष्ट असतात, तेव्हा हे ऋुणानुबंध जुळतात. ओढून ताणून जे होतं त्याला नातं नाही बोलता येत,’ असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.