कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान अनेक कंपन्यांनी कमी वयाचे आणि जुने कर्मचारी यांना नोकरीवरून काढून टाकल्याचे फॉच्र्युन ५०० च्या सर्वेक्षणात दिसून आले आहे. कोरोनाची दुसरी लाट ही या कर्मचाऱ्यांच्या बेरोजगारीचे कारण ठरली आहे.

फॉच्र्युन ५०० च्या कंपन्यांतर्गत करण्यात आलेल्या सर्वेक्षणात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांनी नोकऱ्या गमावल्याचे दिसून आले आहे. भारतात एप्रिल २०२१ दरम्यान दोन हजार लोकांच्या सहभागाने सर्वेक्षण करण्यात आले. एफआयएसच्या माध्यमातून करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार,

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये ५५ वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या ६ टक्के कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कायमस्वरूपात कमी करण्यात आले. मागील वर्षी हे प्रमाण ४ टक्के होते. तर दुसरीकडे २४ वर्षांहून कमी वयाच्या जवळपास ११ टक्के कर्मचाऱ्यांना कायमचे कमी करण्यात आले आहे.

मागील वर्षी ही आकडेवारी १० टक्के होती. भारतीय अर्थव्यवस्थेचा अभ्यास करणाऱ्या सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीने मे महिन्यात स्पष्ट केले होते की, कोविड-१९ च्या दुसऱ्या लाटेदरम्यान देशातील १ कोटीहून अधिक भारतीयांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे,

तर बेरोजगारीचा दर १२ महिने सर्वाधिक म्हणजेच १२ टक्के असणार आहे. सर्वेक्षणानुसार, सर्व वयोगटांतील श्रेणीत मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी अधिक कर्मचाऱ्यांवर नोकरकपातीचे संकट आले आहे. १८ ते २४ वयोगटातील ९ टक्के कर्मचाऱ्यांना तात्पुरत्या स्वरूपात कामावरून हटवण्यात आले आहे.

मागील वर्षी या वयोगटातील नोकरकपातीची आकडेवारी जवळपास २१ टक्के होती. तर यावर्षी ५५ वयापेक्षा अधिक वयाच्या सात टक्के कर्मचाऱ्यांना, तर मागील वर्षी १३ टक्के कर्मचाऱ्यांना तात्पुरत्या नोकरकपातीच्या संकटाला सामोरे जावे लागले होते.

कंपनीने स्पष्ट केले की, याव्यतिरिक्त फसवणुकीच्या घटनांना बळी पडल्याचे प्रमाण १८ ते २४ या वर्गातील ३८ टक्के व २५ ते २९ वयोगटातील ४१ टक्के असल्याचे सांगण्यात आले आहे.