कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वारी रद्द झाली असली, तरी नित्य कार्यक्रम मंदिरात प्रतीकात्मक स्वरुपात सुरू आहेत. संत सोपानदेवांच्या पालखीसमोर होणारे मेंढ्यांचे रिंगण सोपानदेवांच्या मंदिरात पार पडले.
टाळ, मृदंगाचा गजर, हरिनामाचा जयघोष
डोक्यावर तुळशी वृंदावन घेवून, टाळ-मृदुंगाचा गजर आणि ‘राम कृष्ण हरी’ चा जयघोष करीत मेंढ्यांचे पहिले रिंगण मंदिरात पार पडले.
या वेळी उपस्थित भाविक भान हरपून विठू नामाचा गजर करीत होते. टाळ्यांचा कडकडाट, ज्ञानोबा तुकाराम असा जयघोष करीत स्वागत करण्यात आले.
प्रतीकात्मक कार्यक्रम सुरू
सासवड येथून संत सोपानदेव महाराज पालखी प्रस्थान प्रतीकात्मक स्वरुपात पार पडल्यानंतर परंपरेनुसार आज पायी वारीचा सहावा दिवस आहे आणि दुपारचा विसावा बारामती तालुक्यातील पिंपळी- लिमटेक येथे असतो; परंतु वारी बंद असली तरी वारीतील विविध उपक्रमांची परंपरा खंडीत होवू नये, यासाठी मंदिरातच प्रतीकात्मक स्वरुपात मेंढ्यांचे रिंगण घेण्यात आले.
हरिनामाच्या जयघोषात मंदिर प्रदक्षिणा
मंदिरात पहाटे काकडा आरती, महापूजा आणि सकाळी संगीत भजन पार पडल्यानंतर मंदिरात पंचपदी करून संतांचा अभंग घेण्यात आला.
त्यानंतर डोक्यावर तुळशी वृंदावन, खांद्यावर भगवी पताका आणि गळ्यात टाळ मृदुंग घेवून हरिनामाचा गजर करीत मंदिर प्रदक्षिणा घेण्यात आली.
तसेच हरिनामाच्या जयघोषात मेंढ्यानी संपूर्ण मंदिराला प्रदक्षिणा घालून रिंगण पूर्ण केले. या वेळी भाविकांनी ज्ञानोबा तुकाराम चा जयघोष करीत हा सोहळा याची देही याची डोळा अनुभवला.