धरण फुटण्याच्या शक्यतेनं यंत्रणा हाय ॲलर्टवर

पणदेरी धरण फुटण्याची शक्यता वर्तविण्यात आल्याने पोलिसांसह आपत्ती निवारण दल धरणस्थळी दाखल झाले आहे. सर्व यंत्रणा हाय ॲलर्टवर असून, नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याची तयारी करण्यात आली आहे.

पोलिसांचा धीर

मंडणगड तालुक्यातील पणदेरी धरण फुटण्याची शक्यता असल्याची माहिती जिल्हा पोलिस नियंत्रण विभागाला मिळताच पोलिस विभाग अलर्ट झाला आहे.

पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग मदतीच्या आवश्यक साहित्यासह आपल्या शंभर पोलिस अंमलदारांना सोबत घेऊन तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि स्थानिकांना धीर दिला.

जीवितहानी टाळण्याचा प्रयत्न

जिल्हा पोलिस नियंत्रणण कक्षाला पणदेरी धरण फुटण्याची शक्यता असल्याची माहिती प्राप्त झाली. ही माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षकांनी पोलिसांना सूचना दिल्या.

गळतीमुळे कोणतीही जीवितहानी होऊ नये म्हणून डॉ. गर्ग यांनी सहकाऱ्यांसह पणदेरीला धाव घेतली.

पोलिस मुख्यालय, रत्नागिरी येथून जादा कुमक म्हणून शंभर पोलिस रवाना झाले. आपत्कालीन साधन सामग्री, फायबर बोट, लाईफ जॅकेट, रिंग बोये, रोप, सर्च लाईट, स्ट्रेचर, प्रथमोपचार पेटी इत्यादी साहित्य तत्काळ पोहोचविण्यात आले.

नागरिकांचं स्थलांतर

पी. ए. सिस्टीम व मेगाफोनव्दारे स्थलांतरीत होण्याबाबत आवाहन करण्यात आले. स्थलांतरित होण्याकरिता निर्माण होणाऱ्या अडचणी समजून घेऊन जास्तीत जास्त लोकांना स्थलांतरित होण्याबाबत सांगण्यात आले.

बौद्धवाडी, रोहिदासवाडी, कोंडगाव इत्यादी वाडीतील लोकांना महसूल व पोलीस प्रशासनाच्या मदतीने सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यासाठी मदत करण्यात आली.