
मुंबईः कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच तिसरी लाट येण्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला होता. आता प्रशासनही तिस-या लाटेचा सामना करण्यासाठी सज्ज झालं आहे.
त्यामुळंच कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे.
डेल्टा प्लसमुळं वाढला धोका
डेल्टा, डेल्टा प्लस या कोव्हिडच्या नव्या व्हेरियंट्सचा प्रसार होत असून 4 ते 6 आठवड्यांत महाराष्ट्राच्या मोठ्या भागात अधिक घातक रूपात कोरोनाची तिसरी लाट पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
ही लाट रोखण्यासाठीच सामान्यतः आणखी कठोर बंधने लागू करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे, असे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी नव्या आदेशात म्हटले आहे.
कडक निर्बंधाशिवाय पर्याय नाही
डेल्टा, डेल्टा प्लस विषाणूच्या म्युटेशन्स आणि त्यात सातत्याने होत असलेली उत्क्रांती पाहता येत्या काळात कल्पनेपेक्षा गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता दिसून येत आहे.
डेल्टा प्लस हा व्हेरियंट चिंतेचा विषय आहे. वाढती संक्रमणशीलता, फुप्फुसाच्या पेशींना मजबुतीने चिकटण्याची क्षमता, मोनोक्लोनल अँटीबॉडीच्या प्रतिसादात संभाव्य घट करत असल्याचे संपूर्ण जिनोम सिक्वेन्सिंगसाठी स्थापन केलेल्या पथकाने म्हटले आहे.
रत्नागिरी, जळगाव आणि इतर जिल्ह्यांत हा विषाणू सापडल्यामुळे प्रसार रोखण्यासाठी निर्बंध कडक करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.
तिस-या लाटेत 50 लाख रुग्ण?
तिस-या लाटेत राज्यातील किमान 50 लाख नागरिकांना कोरोना संसर्ग होण्याचा अंदाज केंद्रीय यंत्रणांसह राज्याच्या आरोग्य विभागाने वर्तविला आहे.
यात दहा टक्के म्हणजेच पाच लाख बालके व मुले असतील, अशी माहिती अन्न व प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी दिली. तर, दरदिवशी 70 ते 80 हजार नवी रुग्णसंख्या आढळू शकेल,
तर सक्रिय रुग्णांची संख्या 8 लाखांपेक्षा अधिक असेल असा अंदाज टास्क फोर्सने बांधला आहे. केंद्राच्या आयसीएमआरने यापेक्षा अधिक सक्रिय रुग्णांची संख्या असू शकते अशी भीती व्यक्त केली आहे.