औंधमधील परिहार चौकात तीन जणांच्या टोळक्याने कोयत्याचा धाक दाखवत दुचाकीवरील तरुणास लुटल्याची घटना घडली आहे. यात चोरट्यांनी 8 हजारांची रोकड आणि मोबाईल असा 28 हजारांचा ऐवज चोरुन नेला.
याप्रकरणी विनोद यमगर (वय 33, रा. ओमकार कॉलनी, थेरगाव) यांनी फिर्याद दिली आहे. अधिक माहितीनुसार, विनोद भाडेतत्त्वार प्रवाशांची ने-आण करण्याचा व्यवसाय करतात.
पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ते परिहार चौकातील यश टायर्ससमोरील रस्त्यावरुन एका प्रवाशाला घेउन चालले होते. त्यावेळी पाठीमागून दुचाकीवर आलेल्या तिघा चोरट्यांनी विनोदच्या मोटारीला दुचाकी आडवी लावली.
त्यांना कोयत्याचा धाक दाखवून रोख रक्कम आणि मोबाईल लांबविला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक मोहन जाधव अधिक तपास करीत आहेत.