गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेले हडपसर रेल्वे स्टेशनवरून आता स्वतंत्र वाहतूक सुरू होणार आहे. या स्थानकावर ८ जुलै रोजी पहिली स्वतंत्र रेल्वे येणार असून ९ जुलै रोजी ती हैदराबादसाठी रवाना होईल.

रेल्वेची वाहतूक होण्यासाठी या स्थानकावरील काम नुकतेच पूर्ण झाल्यामुळे या स्थानकावरून रेल्वे वाहतूक सुरू करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.

दोन वर्षांत हडपसर स्टेशनचे काम पूर्ण

शहरात पुणे स्टेशन आणि शिवाजीनगर रेल्वे स्टेशन आहे; मात्र पुणे स्टेशनवरूनच स्वतंत्रपणे गाड्या सुटतात. पुणे स्टेशन आणि शिवाजीनगर स्टेशनच्या आजूबाजूला निवासी लोकसंख्येची घनता जास्त आहे.

Advertisement

जागेच्या अभावामुळे या स्थानकांच्या विस्तारीकरणाला मर्यादा आहेत. त्यामुळे पुणे स्टेशनला पर्याय म्हणून हडपसर रेल्वे स्थानक कार्यान्वित करण्याचे रेल्वेने ठरविले आहे. त्यानुसार दोन वर्षांपूर्वी हडपसर रेल्वे स्थानकाचे काम सुरू झाले. हे काम आता अंतिम टप्प्यात आहे.

सोलापूरकडे जाणा-या गाड्या हडपसरहून सुटणार

सोलापूरच्या दिशेने धावणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या या स्थानकावरून सोडण्याचे रेल्वेचे नियोजन आहे, असे रेल्वे प्रशासनाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

रुंद प्लॅटफॉर्म, प्रतीक्षालय, आच्छादित प्लॅटफॉर्म, एक्सलेटर, सुसज्ज तिकीट व्यवस्था, खानपान सेवा, पोलिस, वाहनतळ आदी सुविधा या पुढील काळात टप्प्याटप्प्याने होतील. पीएमपी, रिक्षा आणि कॅबद्वारे प्रवासी हडपसरवरून पुण्यात येऊ शकतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Advertisement

डब्यांची संख्या वाढणार

हडपसर स्थानकावर या पूर्वी १६ डब्यांच्या गाड्या थांबत होत्या. प्लॅटफॉर्मची लांबी कमी असल्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्या या स्थानकावर थांबत नव्हत्या; परंतु आता २२ डब्यांची रेल्वेची वाहतूक येथून होऊ शकेल. तसेच पुढच्या वर्षापर्यंत २४ डब्यांची गाडीही येथून सुरू होऊ शकेल, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले.

 

Advertisement