दोन खून करणा-या चाैघांना १२ तासांत बेड्या

व्हाॅटस्ॲपवर वादग्रस्त स्टेटस्‌ ठेवण्याबाबत विचारणा केल्यावरून दोन तरुणांचा तलवारीने वार करून, तसेच डोक्यात दगड घालून खून केल्याप्रकरणातील चार आरोपींना पोलिसांनी अवघ्या बारा तासांत बेड्या ठोकल्या. दौंड तालुक्यातील पाटस येथील तामखडा परिसरात भानोबा मंदिरासमोर रविवारी रात्री ही घटना घडली.

हे आहेत आरोपी

शिवम संतोष शितकल (वय २३) आणि गणेश रमेश माकर (वय २३, दोघे रा. अंबिकानगर, पाटस) अशी खून झालेल्या दोघांची नावे आहेत.

या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने महेश उर्फ मन्या संजय भागवत (वय २२), महेश मारुती टुले (वय २०, दोघे रा. पाटस, तामखडा), युवराज रामदास शिंदे (वय १९, रा. गिरीम, मदनेवस्ती) आणि गहिनीनाथ बबन माने (वय १९, रा. गिरीम, राघोबानगर) यांना अटक केली आहे.

अशी घडली घटना

खून केल्यानंतर आरोपी बारामती विमानतळ रस्त्यावरील वन विभागाच्या जागेमध्ये लपले होते. त्यांचे काही साथीदार फरारी असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

आरोपींनी खुनाची कबुली दिली असून, या प्रकरणी अर्जुन संभाजी माकर (वय १९, रा. पाटस) याने यवत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवम शितकल आणि गणेश माकर यांना मन्या उर्फ महेश संजय भागवत याने फोनवरून शिव्या दिल्या होत्या.

तसेच, ‘वीकेट तर जाणार, पण क्रिकेटचा खेळ होणार नाही’ असे ‘व्हॉट्सअॅप’वर वादग्रस्त स्टेटस ठेवले होते. यामुळे शिवम आणि गणेश हे आरोपींना याचा जाब विचारण्यासाठी रविवारी रात्री गेले होते.

या वेळी आधीपासूनच दबा धरून बसलेल्या आरोपींनी शिवम आणि गणेश यांच्यावर तलवारीने वार करून आणि डोक्यात दगड घालून खून केला.

वनविभागात लपले होते आरोपी

खूनप्रकरणातील मुख्य आरोपी बारामती विमानतळ रस्त्यावरील वन विभागाच्या जागेत लपले असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती.

यानुसार पथकाने सापळा रचून बारा तासांच्या आता यातील चार आरोपींना अटक केली. त्यांचे इतर साथीदार फरारी असून, त्यांचाही शोध घेण्यात येत असल्याचे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी सांगितले.