अवघ्या दोन महिन्यांत वनाज ते गरवारे महाविद्यालयादरम्यान प्रवाशांसाठी मेट्रो उपलब्ध होईल, यासाठी आता महामेट्रोचे प्रयत्न सुरू झाले आहेत. ट्रॅकचे काम आता पूर्ण झाले असून, तीन स्थानकांची रखडलेली कामे पूर्ण करण्यावर भर असेल.

तांत्रिक चाचणी पूर्ण

वनाज-रामवाडी मार्गावर महामेट्रोने वनाज ते आयडियल कॉलनी दरम्यान तीन किलोमीटर अंतरावर मेट्रोची तांत्रिक चाचणी घेतली.

अर्थात, ही अधिकृत चाचणी नव्हती; परंतु मेट्रोमार्गावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी ट्रायलच्या पूर्वीचा एक टप्पा म्हणून ही चाचणी घेतली. मेट्रोने गुप्तता बाळगण्याचा प्रयत्न केला; परंतु लोकांच्या उत्साहापुढे तो टिकला नाही.

Advertisement

किरकोळ दुरुस्त्या लवकरच

चाचणीमध्ये ट्रॅक (लोहमार्ग), ओव्हरहेड केबल, सिग्नल, व्हाया डक्ट आदींचीही तपासणी झाली. ट्रॅकवरून मेट्रो धावताना या पूर्ण झालेल्या कामांची पाहणी करण्यासाठीच मेट्रोचा वेग अगदी ताशी २० किलोमीटरपेक्षा कमी ठेवला होता.

सुमारे एक तासापेक्षा अधिक वेळ मेट्रो मार्गाची पाहणी झाली. त्यासाठी पाच विभागांचे अधिकारी उपस्थित होते, अशी माहिती महामेट्रोचे प्रकल्प संचालक अतुल गाडगीळ यांनी दिली.

संपूर्ण चाचणी अपेक्षेनुसार झाली. किरकोळ स्वरूपाच्या दुरुस्त्या आहेत. त्या लवकरच पूर्ण केल्या जातील. आता स्थानकांची कामे पूर्ण करण्यावर भर दिला जाईल.

Advertisement

नागपूरचे कोच पुण्यात

वनाज-रामवाडी मार्गावर मेट्रोची चाचणी घेण्यासाठी प्रत्येकी तीन डब्यांच्या दोन रेल्वेगाड्या एप्रिलच्या अखेरीस महामेट्रोने नागपूरहून पुण्यात आणल्या. वनाज येथील मेट्रोच्या यार्डातच त्या रेल्वेगाड्यांचे डबे उतरविले.

त्यांची जुळणी ट्रॅकवरच केली. नागपूरहून आलेल्या दोन रेल्वे ट्रायलसाठीच आहेत. मेट्रोमार्गावरील सहा गाड्यांच्या डब्यांचे उत्पादन परदेशात सुरू असल्याचे महामेट्रोचे महाव्यवस्थापक हेमंत सोनवणे यांनी सांगितले.

आठ दिवसांपूर्वीच तयारी

वनाज-रामवाडी मार्गावर वनाज ते आयडियल कॉलनी दरम्यान मेट्रोची चाचणी घेण्याचे नियोजन आठ दिवसांपूर्वीच केले. त्यानुसार त्याची तयारी सुरू होती.

Advertisement

ट्रॅक, ओव्हरहेड केबल, रेल्वे डबे, सिग्नलिंग आणि व्हाय डक्टची उभारणी करणारा विभाग, असे पाच विभागांतील अधिकारी चाचणीदरम्यान उपस्थित होते.

चाचणीपूर्वी पाचही विभागांनी पाहणी करून त्यांच्या- त्यांच्या विभागाकडून ग्रीन सिग्नल दिला. त्यानंतर मेट्रोची चाचणी निश्चित केली.

 

Advertisement