गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली असून त्याचा परिणाम प्रसिद्ध भुशी धरणाच्या सांडव्यावरून वाहणारे पाणी ओसरलं आहे.

राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोणावळ्यात पर्यटक याच भुशी धरणाचा आनंद घेण्यासाठी येतात; मात्र कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर पर्यटनासाठी बंदी असतानादेखील हौशी नागरिकांचे पाय पर्यटन नगरीकडे वळतात; परंतु आता सांडव्यावरून खाली पाणी पडणं बंद झाल्यानं पर्यटकांची निराशा झाली आहे.

लोणावळ्यातील भुशी डॅम म्हणजे राज्यातील पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू… पावसाळ्यात इथं तुडुंब गर्दी होते… लोणावळ्याच्या वेशीवर हाऊसफुल्लची पाटी लावावी की काय, एवढी गर्दी… परंतु सध्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांवर निर्बंध लावण्यात आले आहेत.

Advertisement

तरीही काही हौशी पर्यटक इथे येतात; मात्र यावेळी आतापर्यंत कमी पाऊस झाल्याने पर्यटकांचं आकर्षण असलेल्या भुशी धरणाच्या सांडव्यावरून वाहणारे पाणी कमी झालं आहे.

तर तो नजारा काही और…

इतक्या कमी प्रमाणाच्या पाण्यातही आनंद घेण्याचा प्रयत्न काही पर्यटक करतानाच चित्रं सध्या दिसत आहे; मात्र नेहमीसारखा पाऊस झाला असता आणि सांडव्यावरून दरवर्षीप्रमाणे पाणी वाहिलं असतं तर तो नजारा काही और असतो, अशी खंत पर्यटक व्यक्त करत आहेत.

पर्यटकांना अजूनही बंदी

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेले अनेक दिवस महाराष्ट्रात कडक निर्बंध लावले गेले आहेत.

Advertisement

त्यानुसार राज्यातील जास्त कोरोना रुग्ण असलेली शहरं, धार्मिक स्थळं, तसंच पर्यटन स्थळांवर कडक निर्बंध लावले आहेत. त्याच अनुषंगाने लोणावळ्यातदेखील पर्यटनावर बंदी आहे.