राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आपली सिल्लो़डमधील जमीन हडपली असल्याचा आरोप करीत एका महिलेने विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आंदोलन करून, लक्ष वेधून घेतले.

महिला पोलिसांच्या ताब्यात

अब्दुल सत्तारांनी माझी जमीन हडपलीय, त्यामुळे आमचं जीव उध्वस्त झालंय, असा आरोप करत सिल्लोडच्या महिलेने मंत्रालयाच्या गेटसमोर आंदोलन केलं. पुढील काही प्रकार घडायच्या आतमध्ये मरीन ड्राईव्ह पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतलं.

महिला मंत्र्यांच्या मतदारसंघातील

औरंगाबाद सिल्लोड तालुक्यातील उंडणगावमधील आशाबाई बोराडे या महिलेने मंत्रालयाच्या गेटसमोर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला.

Advertisement

या महिलेसोबत तिची मुलगी आणि सामाजिक कार्यकर्त्या विशाखा गायकवाडया देखील होत्या; मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करत तिघींनाही ताब्यात घेतलं.

जमीन बळकावून त्यावर काॅलेजची इमारत

मंत्री अब्दुल सत्तार यांनी माझी जमीन बळकावल्याचा आरोप आशाबाई बोराडे या महिलेने केला आहे. शिवाय या जमिनीवर त्यांनी बेकायदेशीररित्या व नियमबाह्य पद्धतीने कॉलेजची इमारत उभारलेली आहे, असा आरोप या महिलेने केला आहे.

सत्तार यांच्या त्रासामुळे आमचं संपूर्ण जीवन उध्वस्त होत असल्याचा आरोप तिने केला आहे. ही महिला ही शेतकरी कुटुंबातून असून तिचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे.

Advertisement

सत्तार यांच्या दबावामुळे तहसीलदारांनीसुद्धा महिलेच्या नावावर महसूल अभिलेखामध्ये फेरफार घेण्यास टाळाटाळ केली असल्याचं तिचं म्हणणं आहे आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेतली नाही, असाही आरोप संबंधित महिलेनं केला आहे.