नाशिक फाटा उड्डाणपुलाखाली दोन दिवसांपूर्वी अनोळखी महिलेचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला होता. दरम्यान महिलेची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले असून तिने आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. तसेच नैरहस्यातून आत्महत्या केल्याची शक्यता नातेवाईकांनी व्यक्त केली आहे.

कविता विलास कडू (वय ३९, रा. नांदेडसिटी, पुणे) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. सोमवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास तिचा मृतदेह नाशिक फाटा पुलाच्याखाली संशयास्पद अवस्थेत आढळून आला होता. रविवारी मध्यरात्री मयत महिला नांदेड सिटी येथून नाशिक फाटा येथे आली होती.

तिथे पैशावरून तिचा रिक्षा चालकाशी वाद झाला. त्यानंतर तिने दुसऱ्या रिक्षा चालकाला आपला भाऊ येणार असल्याने पुलावर सोडण्याची विनंती केली. त्या रिक्षा चालकाने तिला पुलावर सोडले. जर भाऊ आला नाही तर मला फोन करून बोलवा, मी आपल्याला आपल्या घरी सोडेल, असे त्या रिक्षावाल्याने सांगून त्या महिलेचा मोबाइल क्रमांक घेतला.

पहाटे चार वाजताच्या दरम्यान त्या रिक्षा चालकाने महिलेला फोनही केला. मात्र तिने उचलला नाही. दरम्यान महिलेने आपला मोबाइल पुलाच्या कठडयावर ठेवत दोन मजल्या इतक्‍या उचं पुलावरून खाली उडी मारली.पहाटे चार वाजण्याच्या सुमारास दुधवाल्यांना तो मोबाइल मिळाला. त्या मोबाइलवर कविता यांच्या नातेवाइकांचे फोन आले. मात्र कविता कुठे आहेत हे आपल्याला माहिती नसल्याचे दुधवाल्यांनी तिच्या नातेवाईकांना सांगितले.

पोलिसांकडून त्या महिलेचा मोबाइल क्रमांक मिळवून पोलिसांनी दुधवाल्यांना बोलविले. त्यानंतर तिच्या मोबाइलवरून नातेवाइकांशी संपर्क केला. कविता यांचा घटस्फोट झाला असल्याने सध्या त्या एकट्याच राहत असल्याने त्यांना नैराश्‍य आले होते.

त्यातूनच त्यांनी आत्महत्या केली असावी, अशी शक्‍यता त्यांच्या नातेवाईकांनी व्यक्‍त केली. दरम्यान शवविच्छेदन अहवालात कविता यांनी उंचावरून उडी मारल्याने त्यांना अनेक ठिकाणी जखमी होऊन त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे.