स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढविण्याच्या काँग्रेसच्या निर्णयावर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून टीका होत असली, तरी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा स्वबळाचा सूर कायम आहे.

पंत्रप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामान्य लोकांना नोटबंदीच्या वेळी लाईनमध्ये लावून मारले. देशात तेव्हापासूनच महागाई वाढू लागली आहे. आता देशाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी काँग्रेसशिवाय पर्याय नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सर्वत्र स्वबळाची तयारी सुरू

कोथरुड येथील नगरसेवक चंदू कदम यांच्यावतीने पाच हजार महिलांचे मोफत लसीकरण मोहिमेचे उद्धाटन रविवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी विश्वजित कदम, मोहन जोशी आदी उपस्थित होते.

काँगेसने मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची भूमिका घेतल्यानंतर आता राज्यतील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकादेखील स्वबळावर लढविली जाणार आहे. काँगेसने तशी तयारीदेखील सुरू केली असल्याचे त्यांनी सांगितले.

ट्रम्प यांच्या अहमदाबाद सभेमुळे फैलावला कोरोना

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशात अनेकांचे प्राण गेले. कोरोनाबाबत केंद्रांचे नियोजनच चुकल्याने हे संकट वाढत गेले. मोदी यांनी अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भारतात बोलावून लाखोंची जमवलेली गर्दी कोरोनाच्या फैलावला प्रामुख्याने कारणीभूत ठरली असल्याची टीका पटोले यांनी केली.

ठाकरे यांच्यासोबतच काँग्रेस राहणार

सर्व पक्षांना आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. त्यामुळे स्वबळावर लढणे हे काय चुकीचे नाही. तसेच आपण उद्धव ठाकरे यांच्या सोबत असून सरकारला कोणताही धोका नसल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले.