खासदार संभाजीराजे हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. आज बीडमध्ये त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या वेळी त्यांनी ओबीसींबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली. ओबीसी समाजाला दुखावून मी कोणतेही काम करू शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

जातीविषतेविरुद्ध लढा

जातीविषमता दूर करण्यासाठी माझा हा लढा आहे. कुठल्याही पक्षाच्या विरोधात माझा लढा नाही, अशी ग्वाही देतानाच लोकप्रतिनिधींनी आता मराठा समाजाला वेठीस धरू नये. सगळ्या पुढाऱ्यांनी कायद्याचा अभ्यास करून आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी केले.

१८ पगड जातीसाठी लढा

मी छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहूंचा वंशज आहे, अठरा पगड जातीला एकत्र करण्यासाठी ही संवाद यात्रा काढली आहे. ओबीसीला दुखावून मी कोणतही काम करू शकत नाही.

Advertisement

त्यामुळं मी तसं बोललो. पुढाऱ्यांनी आता समाजाला फसवू नये. जे खर आहे ते सांगावं. 102 व्या घटना दुरूस्तीने राज्याचे अधिकार संपुष्टात आले आहेत, असं संभाजीराजे यांनी सांगितले.

…तर राजीनामा द्यायालाही तयार

मराठा आरक्षणासाठी मी राजीनामा दिला तर मार्ग निघणार का? निघत असेल तर मी राजीनामा द्यायला तयार आहे, असा पुनरुच्चार त्यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मी भेट घेतली. ते मराठा आरक्षणा संदर्भात सकारात्मक आहेत.

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या लढ्यात मी पाठीशी आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षण संदर्भात माझा अभ्यास सुरू आहे; मात्र बहुजनांच्या प्रश्नासंदर्भात सदैव त्यांच्या पाठीशी आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Advertisement

जाब विचारायचा असेल, तर मुख्यमंत्री करा

एका कार्यक्रमात खासदार संभाजीराजे यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना थेट मला मुख्यमंत्री करा, असं म्हटलं होतं. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन तुम्हाला मला जाब विचारायचा असेल, तर आधी मला मुख्यंमंत्रिपदावर बसवा, असे वक्तव्य त्यांनी केले होते.

संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. त्या वेळी संभाजीराजांनी आपला रुद्रावतार दाखवला. त्यांनी उलट संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांवर शाब्दिक हल्ला केला.

तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील, तर आजी-माजी मुख्यमंत्र्यांना आणि पालकमंत्र्यांना विचारा; मात्र त्यांच्याकडून तुम्हाला उत्तर मिळणार नाही. मला प्रश्न विचारायचे असतील तर प्रथम मला मुख्यमंत्री करा, असे संभाजीराजे यांनी म्हटले.

Advertisement