दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेऊन आलेल्या पंकजा मुंडे यांना पुढचा राजकीय प्रवास अजूनही खडतर वाटतो आहे.
एकीकडे कुणाचा अनादर करायचा नाही, असं सांगताना मोदी-शाह यांना नेते मानायचे आणि राज्यातील कुणालाही नेता मानायचे नाही, हा त्यांचा रोखठोक बाणा देवेंद्र फडणवीस यांच्यावरचा निशाणा मानला जातो.
सूचक विधाने आणि इशाराही
खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रिपदातून डावलल्याने त्यांच्या समर्थकांनी राजीनामे द्यायला सुरुवात केली होती.
त्या सर्वांची बैठक वरळीला घेऊन पंकजा यांनी त्यांचे राजीनामे फेटाळले. कार्यकर्त्यांना धीर दिला. या वेळी त्यांनी काही सूचक विधाने केली, रोखठोक भाष्य केलं.
मोदी-शाह हेच आपले नेते
मी कुणाचा अनादर करीत नाही, असे सांगताना पंकजा मुंडे यांनी प्रत्यक्षात केंद्रीय नेत्यांवर विश्वास ठेवण्याचा कार्यकर्त्यांना सल्ला दिला.
याचा अर्थ राज्यात त्या कुणालाही नेता मानायला तयार नाहीत, असा होतो. नरेंद्र मोदी आणि अमित शाह हेच आपले नेते आहेत, असे सांगून देवेंद्र फडणवीस यांच्यावर पंकजा यांनी निशाणा साधला.
छत अंगावर पडेल, तेव्हा बघू
“आपली शक्ती कमी करण्याचा डाव आहे; पण आपण हा डाव यशस्वी होऊ द्यायचा नाही. मला पुढेही खडतर मार्ग दिसतो आहे. योग्य निर्णय घेण्याची योग्य वेळ असते.
आपण वारकरी आहोत, सात्विक आहोत. ज्या दिवशी छत अंगावर पडेल तेव्हा बघू,” असा गर्भित इशारा त्यांनी दिला.
धर्मयुद्ध टाळण्याचा प्रयत्न
पाच पांडव का जिंकले कारण त्यांच्याकडे संयम होता. जो चांगला असतो, तो युद्ध टाळण्याचा प्रयत्न करतो. मी धर्मयुद्ध टाळण्याचा प्रयत्न तेव्हापर्यंत करते, जेव्हापर्यंत शक्य आहे. आम्ही कुणालाच भीत नाही. मी कुणाचा अनादार करत नाही.
मी माझ्यापेक्षा वयाने मोठ्या माणसाचा आदर करते. मला स्वतःसाठी काही नको, मला तुमच्यासाठी हवं आहे. मी पदावर नाही. मी आज तुमच्या पालकत्वाच्या भूमिकेत आहे. मला कशाचीही आवश्यकता नाही, असं पंकजा यांनी सांगितलं.
तुमचं पद महत्त्वाचं
तुमचं पद मला प्रीतम ताईंच्या मंत्रिपदापेक्षा जास्त महत्वाचं आहे. आपलं घर आपण सोडायचं नाही. पंतप्रधान मोदींसाठी घोषणा द्या.
त्यांना ऐकू जाईल एवढया मोठ्यांनी घोषणा द्या. माझ्या माणसांचे तुकडे पाडण्याचे अनेक प्रयत्न केले; पण ते सफल होऊ देऊ नका, असं पंकजा म्हणाल्या.