File Photo

गुन्हेगार माझे होर्डिंग्ज लावत असतील तर यात माझा काय दोष? आम्ही आवाहन करण्याचे काम केले होते. त्यामुळे कुणी चुकीचं काम केलं असेल तर पोलिसांनी कारवाई करावी. त्यांना कशाची बंदी नाही, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या फलकांबाबत भाष्य केले.

आवाहन धुडकावून फलक

पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये अनेक ठिकाणी शुभेच्छा देणारे होर्डिंग्ज लावण्यात आले होते. होर्डिंग्ज न लावण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसकडून करुनही अनेक ठिकाणी फलक लावण्यात आल्याचे पाहायला मिळाले होते.

सत्ता भाजपची, कारवाई करा

या मुद्द्यावर बोलताना अजित पवार म्हणाले, की होर्डिंग लावण्यास मी सांगितले नव्हते. मी अनेक वर्षांपासून पिंपरी-चिंचवडमध्ये येतो. त्यामुळे येथील नागरिकांना माझी मतं स्पष्टपणे माहिती आहेत.

Advertisement

त्यामुळे कोणताही मुद्दा उपस्थित करणे योग्य नाही. मी नियमाचा पालन करणारा माणूस आहे. होर्डिंग चुकीचे लागले असतील, तर भाजपची येथे सत्ता आहे. भाजपने कारवाई करावी.’

लसीकरणाला चांगला प्रतिसाद

अजित पवार पत्रकारांशी बोलताना म्हणाले, की देशातील जनता लस घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात समोर येत आहे. याआधी अनेकजण लस घेण्यास घाबरत होते; पण लोकांच्या मनातील शंका दूर झाल्या आहेत. त्यामुळे ही चांगली गोष्ट आहे. ग्रामीण भागातूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

स्फुरण येण्यासाठी वक्तव्य

पिंपरी-चिंचवड येथे खासदार संजय राऊत आले होते. यावेळी त्यांनी 50 नगरसेवक निवडून येतील, असा दावा केला होता. त्यावर पवार म्हणाले, की कुठल्याही पक्षाचे नेते कार्यकर्यांना स्फुरण चढावं, ईर्षा निर्माण व्हावी यासाठी असे वक्तव्य करत असतात. भाजप, काँग्रेस, शिवसेना कोणीही कार्यकर्त्यांशी बोलताना असे वक्तव्य करू शकतात.

Advertisement

दोन टॅगलाईन चर्चेत

अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भाजप आणि राष्ट्रवादीने शहरात जोरदार बॅनरबाजी केली आहे. येत्या सहा महिन्यांत महापालिकेच्या निवडणुका होऊ घातलेल्या असल्याने आपला नेता किती पावरफूल आहे हे दाखवण्यासाठी जणू स्पर्धा लागली आहे.

पवार यांच्या वाढदिवसाचे कॅम्पेन चालविण्यात आले. त्याची टॅगलाईन ”कारभारी लय भारी” अशी होती. तर भाजपने देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचं होर्डिंग कॅम्पेन केले त्याची टॅगलाईन ”नव्या पुण्याच्या विकासाचे शिल्पकार अशी होती.

 

Advertisement