परप्रांतीयांसंबंधी केलेल्या भाषणाच्या क्लिप मी चंद्रकांत पाटलांना पाठविल्या नाहीत. त्यांना त्या कुणी पाठविल्या असतील, याची माहिती मला नाही; परंतु मी माझी भूमिका कधी बदलत नाही, असे स्पष्टीकरण मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिले.

क्लिप कुणी पाठविल्या का, याची चाैकशी करतो

राज ठाकरे पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. भाजपसोबत मनसेची युती होणार आहे का? असा सवाल त्यांना करण्यात आला, त्यावर तुम्हीच प्रश्न निर्माण करता आणि आम्हाला उत्तर विचारता. मी चंद्रकांत पाटील यांना क्लिप पाठवली नाही.

मी बोललो होतो क्लिप पाठवेल. त्यांना कोणी पाठवल्या माहीत नाही. त्यांना याबाबत विचारणार आहे. माझं भाषण हिंदीत होतं. ते हिंदी भाषिकांना आवडलं. तुम्हाला कळलं नसेल, तर तुम्हाला पाठवतो. असं मी चंद्रकांत पाटील यांना म्हणालो होतो.

त्यावर, मला पाठव. मला नक्की ऐकायला आवडेल, असं ते म्हणाले होते. त्यानंतर मुंबईत आल्यावर मी एकदोन जणांशी याबाबत बोललो होतो. त्यापैकी एकाने पाठवली असेल की नाही ते विचारतो, असं राज ठाकरे म्हणाले.

माझ्या भूमिका क्लिअर

राज ठाकरे यांनी परप्रांतीयांबाबतची भूमिका स्पष्ट केली, तर आम्ही युतीबाबत विचार करू, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. त्याबाबत राज यांना विचारण्यात आलं. त्यावर, भूमिका क्लिअर काय करायच्या. माझ्या भूमिका क्लिअर आहेत.

माझ्या भूमिका आजपर्यंत मांडल्या त्या अत्यंत स्पष्ट आहेत. त्या देश हिताच्या आहेत आणि महाराष्ट्र हिताच्या आहेत. त्यात प्रत्येक राज्यांनी आपली भूमिका कशी निभावली पाहिजे, काय काय गोष्टी केल्या पाहिजेत,याचा उल्लेख असतो.

तुम्ही आमच्यावर आक्रमण करू नका. आम्ही तुमच्यावर आक्रमण करणार नाही. आसाम आणि मिझोराममध्ये सध्या तेच होत आहे, असं ते म्हणाले.

माझा विरोध भूमिकांना, व्यक्तीला नाही

माझा भूमिकांना विरोध असतो. व्यक्तीला नाही. हे मी अनेकदा स्पष्ट केलं आहे. मोदी असतील किंवा अमित शाह असतील. त्यांच्याशी माझं वैयक्तिक देणघेणं नाही. ज्या भूमिका पटल्या नाहीत, त्याला विरोध केला आणि ज्या पटल्या त्याचं जाहीर अभिनंदनही केलं आहे.

त्याचं समर्थनही केलं. त्या समर्थनासाठी मोर्चाही काढला आहे. जे पटत नाही, ते पटत नाही सांगणं महत्त्वाचं आहे. या सर्व गोष्टीसाठी छक्केपंजे करू का?, असंही ते म्हणाले.

जो टारगट त्याला टार्गेट करणार

महापालिका निवडणुकीत तुम्ही कुणाला टार्गेट करणार असा सवाल त्यांना करण्यात आला. त्या वेळी जो टारगट असेल त्याच्यावर टार्गेट करणार, असं उत्तर राज यांनी दिलं.