पुणे महानगर पालिकेच्या सुमारे २० हेक्टर क्षेत्रावरील १२० ‘अॅमिनिटी स्पेस’ (सुविधा क्षेत्र) ९९ वर्षांच्या कराराने खासगी विकसकांना देण्याबाबतचा निर्णय स्थानिक राष्ट्रवादीच्या नेत्यांना विचारून घेणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.

अजित पवार यांनी ही भूमिका घेतल्यामुळे सत्ताधारी भाजपच्या अडचणींमध्ये वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. अजित पवार यांनी जिल्हा परिषदेत झालेल्या कार्यक्रमानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी अजित पवार यांनी म्हटले आहे की,

‘महापालिकेच्या ताब्यातील या अॅमेनिटी स्पेसचा गैरवापर होत असल्याने त्यांची विक्री करण्याची परवानगी मिळावी म्हणून महापालिकेचे सभागृह नेते गणेश बीडकर आपल्याकडे आले होते. त्यांना प्रस्ताव पाठविण्यास सांगितले असले तरी, त्या प्रस्तावाला परवानगी देणार असल्याचे मी अद्याप सांगितलेले नाही.

पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चेतन तुपे, सुनील टिंगरे, शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्याशी आपण चर्चा करणार आहे. हे तिघेही महापालिकेचे सदस्य असल्याने अॅमेनिटी दीर्घ कराराने भाड्याने देण्याबाबत त्यांची मते जाणून घेतल्यानंतरच पुढील निर्णय घेण्यात येईल,’

गेल्या वर्षी महानगर पालिकेने अमिनेटीं स्पेस बद्दलची जागा भाड्याने देण्याचा निर्णय घेतला होता. त्यावरून विरोधी पक्ष आणि सत्ताधाऱ्यांमध्ये वाद उद्भवला होता. त्यावरून अजित पवार यांनी त्यांचे मत मांडले आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पण मत मांडले आहे.