Photo Credit : Sahapedia

जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा ३३६ वा पंढरपूर पायी आषाढी वारी सोहळा होणारच असा निर्धार संत तुकाराम महाराज देहू देवस्थानने घेतला आहे. महाराष्ट्रातील वारकरी सांप्रदायिक संस्था, मंडळे, प्रमुख देवस्थान, दिंडीकरी यांनी देहू देवस्थानला पाठिंबा दर्शविल्याने पायी वारीचा निर्णय घेतला आहे.

पायी वारीस शासन परवानगी देणारच असा विश्वासही वारकऱ्यांनी व्यक्त केला असून त्यांनी पायी वारीची तयारी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आता सरकार काय निर्णय घेणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. प्रमुख देवस्थानचे विश्वस्त, अध्यक्ष, मानकरी, फडकरी, दिंडीप्रमुख यांच्याशी चर्चा करूनच यंदाचा पायी आषाढी वारीचा सोहळा होणार आहे.

परंतु, वारकरी, भाविकभक्तांच्या संख्येची मर्यादा असणार आहे. त्यासाठी शासनाशी चर्चा विनिमय करूनच हा आषाढी पायी वारी सोहळा होणार आहे. आषाढी वारीत ३३० ते ३५० दिंड्या सहभागी होतात. प्रत्येक दिंडीत कमीत कमी ५०० वारकरी भाविक-भक्त असतात.

Advertisement

त्यामुळे त्यांची संख्या २ ते ३ लाख तर इतर भाविक-भक्त असा तीन ते चार लाख समाज या आषाढी वारीत सहभागी असतो. मात्र, या वर्षी कोरोना महामारीचे संकट असल्याने शासनाशी चर्चा करून मर्यादित वारकरी, भाविक-भक्तांच्या संख्येत यंदाचा आषाढी वारी सोहळा पार पडला जाणार आहे.

तर, देहू देवस्थान संस्थानच्या वतीने आषाढी पायी वारी होणारच आहे. याबाबत राज्य सरकारशी पत्रव्यवहार केला आहे. महाराष्ट्रातील काही सांप्रदायिक मंडळे, संस्था, ३६ वारकरी संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे.

त्यामुळे यंदाचा पायी आषाढी वारीचा सोहळा करण्याचा निर्णय सर्वानुमते घेतला आहे. शासनाने दिलेल्या आदेश-निर्देशाचे पालन करून हा पालखी सोहळा संपन्न करणार आहोत, असे विश्वस्त ह.भ.प. माणिक महाराज मोरे यांनी सांगितले.

Advertisement