file photo

मुंबई : यापूर्वी सर्वोच्च न्यायालयापर्यंत प्रकरण जाऊनही राफेलचे भूत भाजपच्या मानगुटीवरून उतरायला तयार नाही. आता फ्रान्स सरकारने या विमान खरेदीतील कथित गैरव्यवहाराची चाैकशी सुरू केली आहे.

या वादात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी उडी घेतली असून, भारतात राफेल व्यवहाराची चाैकशी का नाही, असा सवाल केला आहे.

सत्य फार काळ लपत नाही?

“राफेल फायटर जेटच्या व्यवहारात गौडबंगाल आहे. या व्यवहारात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सातत्याने उघड केले. या व्यवहाराची चौकशी करण्याची मागणीही केली;

Advertisement

परंतु मोदी सरकारने या व्यवहाराची चौकशी न करता प्रकरण गुंडाळले. सत्य जास्त दिवस लपत नसते, असे थोरात म्हणाले.

मित्रांना फायदा होण्यासाठी करारात बदल

संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळातच 126 राफेल फायटर जेट विमाने प्रत्येकी 556 कोटी रुपयांनी खरेदी करण्याचे निश्चित झाले होते; परंतु त्यानंतर आलेल्या मोदी सरकारने याच फायटर जेटसाठी भरमसाठ असे 1670 कोटी रुपये देऊन व्यवहार केला.

हा व्यवहार करताना अनेक बाबींना फाटा देण्यात आला. तसेच मोदींच्या उद्योगपती मित्रांचा फायदा व्हावा यासाठी या क्षेत्रातील काहीही अनुभव नसलेल्या अनिल अंबानी यांच्या कंपनीला याचे कंत्राट देण्यात आले.

Advertisement

या संपूर्ण व्यवहारात मोठा घोटाळा झाल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले होते; परंतु त्यांच्याकडे नेहमीप्रमाणे मोदी सरकारने दुर्लक्ष करुन हे प्रकरण गुंडाळले, असा आरोप थोरात यांनी केला.

“‘चौकीदार ही चोर है’ हेच सत्य”

“राफेल व्यवहारात गडबड झाल्यानेच फ्रान्समध्ये याची चौकशी सुरू झाली आहे. मग, भारतातच या व्यवहारावर पांघरुण घालण्याचे काम का केले जात आहे. मोदी सरकार चौकशी करायला का घाबरत आहे आणि कोणाला वाचवण्यासाठी चौकशीपासून पळ काढला जात आहे.

राफेल व्यवहार जर स्वच्छ व पारदर्शी झाला असेल तर मोदी सरकारने त्याची चौकशी करून जनतेसमोर सत्य आणले पाहिजे. अन्यथा राहुल गांधी म्हणतात तसे ‘चौकीदार ही चोर है’ हेच सत्य आहे,” असंही थोरात म्हणाले.

Advertisement