डोणजे गावातील वाईल्डर नेक्स हॉटेलमध्ये मी व माझ्या मित्रासोबत मुक्कामी असताना पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास तीन ते चार गाड्यांमधून सभापती भगवान पोखरकर, जालिंदर पोखरकर, केशव आरगडे हे इतर पंधरा ते वीस लोकांसोबत येऊन हातातील लोखंडी रॉड व काडीने मारहाण करून फिर्यादीच्या डोक्यास लोखंडी रॉडने मारून जिवे मारण्याचा प्रयत्न केला.

आरोपीपैकी एकाने पिस्टल काढून हवेत फायर करून जिवे मारण्याची धमकी दिली, अशी फिर्याद प्रसाद दशरथ काळे (रा. गोलेगाव, ता.खेड, जि. पुणे) यांनी २७ मे रोजी हवेली पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली. त्या फिर्यादीवरून हवेली पोलीस स्टेशन गुन्हा दाखल आहे.

सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी सई भोरे पाटील यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन हवेली पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना आरोपींना तत्काळ अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

Advertisement

त्यानुसार पोलीस निरीक्षक घनवट यांनी पोलीस पो.स.ई अमोल गोरे, पो.स.ई रामेश्वर धोंडगे, पो ह. सचिन गायकवाड, म.पो.कॉ. पूनम गुंड, पो. ह. काशिनाथ राजापुरे, पो. हवा मुकुंद कदम यांना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक समांतर तपास करून आरोपींचा शोध घेत असताना पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की,

सदर गुन्ह्यातील आरोपी सभापती भगवान पोखरकर तसेच केशव आरगडे हे मंगला टॉकीज शिवाजीनगर या भागात येणार असल्याचे खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी सापळा लावून दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी हवेली पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात दिले.

आरोपीकडे केलेल्या प्राथमिक चौकशीमध्ये खेड पंचायत समिती निवडणूक चार वर्षांपूर्वी झाली असून एकूण १४ पंचायत समिती सदस्य आहेत. पंचायत समितीवरील आरोपी सभापतीच्या सभापती पदाची मुदत इतर पंचायत समिती सदस्यांनी ठरविल्यानुसार संपली होती.

Advertisement

परंतु, तरीही तो राजीनामा देत नव्हता म्हणून २४ मे २०२१ रोजी सर्व सदस्यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वासाचा ठराव दाखल केला होता. त्यावर खेड प्रांत यांना सूचना देऊन त्यांच्या समोर ३१ मे २०२१ रोजी बहुमत सुनावणी होणार होती. याच गोष्टीचा मनात राग धरून भगवान पोखरकर व त्यांच्या १५ ते २० साथीदारांसह सदरचा गुन्हा केला आहे, असे निष्पन्न झाले आहे.