तमिळनाडू राज्यात मुख्यालय असलेल्या एका कोरियन कंपनीने दिलेल्या ‘वर्क ऑर्डर’नुसार बांधकाम व्यावसायिकाने इमारत बांधली; मात्र कंपनीचे प्रशासकच गायब झाल्याने व्यावसायिकाची सुमारे साडेतीन कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे.

इमारत बांधली, प्रशासक पसार

तमिळनाडू येथे देशाचे मुख्यालय असलेल्या कोरियन कंपनीसाठी एका बांधकाम व्यावसायिकाला पुण्यात कार्यालय बांधण्यास सांगून, संबंधित कंपनीचे प्रशासक पसार झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

या प्रकरणी बी. टी. कवडे रस्ता येथे राहणाऱ्या एका ५१ वर्षीय बांधकाम व्यावसायिकाने मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Advertisement

त्यावरून ‘यू. सेउँग. सँग सा इंडिया’ या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि कार्यकारी संचालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताबाही नाही आणि पैसेही

मुंढवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार बांधकाम व्यावसायिक आहेत. कोरियन कंपनीच्या भारतातील अधिकाऱ्यांनी २०१८मध्ये तक्रारदाराशी संपर्क साधला होता.

त्यांच्या कंपनीसाठी पुण्यात इमारतीचे बांधकाम आणि इंटेरिअरचे काम तक्रारदाराला दिले होते. त्यासाठी कंपनीने तक्रारदारास रीतसर ‘वर्क ऑर्डर’देखील दिली होती. त्यानंतर तक्रारदाराने ठरल्यानुसार इमारतीचे बांधकाम सुरू केले.

Advertisement

तक्रारदाराने ते काम पूर्णही केले; मात्र कंपनीच्या अधिकाऱ्यांनी इमारतीचा ताबा न घेता आणि तक्रारदाराला ठरल्यानुसार पैसेही दिले नाहीत.

संबंधित अधिकाऱ्यांनी तक्रारदाराला कोणतीही पूर्वकल्पना न देता, पुण्यातील अन्य कार्यालये बंद केली. त्यामुळे फसवणूक झाल्याचा प्रकार आल्यानंतर तक्रारदाराने पोलिसांकडे धाव घेतली. मुंढवा पोलिस प्रकरणाचा तपास करीत आहेत.

पैसे घेतले; जागाही दिली नाही

हवेली तालुक्यातील आव्हाळवाडी येथे ११ हजार चौरस फूट जागेची विक्री करण्याच्या बहाण्याने खरेदीदारांकडून एक कोटी सहा लाख रुपये घेऊन, त्यांना जागेचा ताबाही दिला नाही.

Advertisement

या प्रकरणी जागा विक्रेत्यासह चौघांविरोधात लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सप्टेंबर २०१८पासून सुरू आहे.

खरेदीदारांनी विक्रेत्याला पैसे दिल्यानंतर खरेदीखत करण्यात आले. मात्र, त्यानंतर ते खरेदीखत मान्य नसून, त्यांनी जागेचा ताबा देण्यास नकार दिला.

 

Advertisement