file photo

पिंपरी : नगर अर्बन वँकेतील गैरव्यवहारप्रकरणी तक्रार करणा-या नगर जिल्ह्यातील तीन डाॅक्टरांना बेड्या पडल्या आहेत. त्यांची रवानगी पोलिस कोठडीत झाली आहे.

ही आहेत डाॅक्टरांची नावे

नगर अर्बन बँकेच्या चिंचवड शाखेत झालेल्या २२ कोटी रुपयांच्या कर्ज अपहार प्रकरणात अहमदनगर येथून तीन डॉक्टरांना अटक करण्यात आली.

न्यायालयाने त्यांना ३० जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली.
डॉ. भास्कर सिनारे, डॉ. रवींद्र कवडे व डॉ. विनोद श्रीखंडे अशी अटक झालेल्या तिघा डॉक्टरांची नावे आहेत.

Advertisement

सहा कोटी रुपये डाॅक्टरांच्या खात्यात

बँकेची फसवणूक करून घेतलेल्या कर्जाच्या रकमेतील सहा कोटी चार लाख रुपये या तिघा डॉक्टरांच्या खात्यावर वर्ग झाल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

नगर अर्बन बँकेच्या चिंचवड शाखेचे व्यवस्थापक महादेव साळवे यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात २५ जानेवारी २०२१ रोजी फिर्याद दिली होती.

त्यानुसार बबन निवृत्ती चव्हाण, वंदना बबन चव्हाण, यज्ञेश बबन चव्हाण, मंजूदेवी हरिओम प्रसाद, रामचंद्र अण्णासाहेब तांबिले, अभिजित नाथा घुले यांच्यासह कर्ज उपसमिती सदस्य व बँकेच्या संचालकांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.

Advertisement

बँकेच्याविरोधात डॉक्टरांनी केली होती तक्रार

अहमदनगर येथील एम्स हॉस्पिटलच्या मशिनरीसाठी नगर अर्बन बँकेत परस्पर खाते उघडून आमच्या नावे १८ कोटींचे कर्ज घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी डॉ. भास्कर सिनारे, डॉ. रवींद्र कवडे व डॉ. विनोंद श्रीखंडे यांनी २७ ऑगस्ट २०१९ रोजी नगरच्या कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता;

मात्र याबाबत गुन्हा दाखल न झाल्याने या तिघा डॉक्टरांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. याप्रकरणी बँकेने चौकशी समिती नेमून दोषींवर कारवाई करावी, असे आदेश न्यायालयाने दिले;

मात्र यावर काहीच कार्यवाही झाली नाही. आता बँक प्रकरणी दाखल असलेल्या दुस-या गुन्ह्यात या डॉक्टरांना अटक झाल्याने या प्रकरणातील गुंता आणखी वाढला आहे.

Advertisement